थोडक्यात चार बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:32+5:302021-01-08T04:16:32+5:30
मुंबई : भारतीय हरितक्रांतीला चालना देणारे अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे बुधवार, २७ ...
मुंबई : भारतीय हरितक्रांतीला चालना देणारे अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे बुधवार, २७ जानेवारी २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ नेते आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी बालगीतांचा जागर
मुंबई : फुलबागेत फुले जशी फुलतात, तशी कवितेच्या बागेत कविता उमलतात, या संकल्पनेतून चेंबूरच्या सुधा मोहन वेर्णेकर शाळेत सुंदर अशा ३० बालकविता फलकावर डौलत होत्या. सोबत बालक चित्रेही होती. या कविता बालकांची वाट बघत आहेत, अशा डॉ. विजया वाड यांच्या संकल्पनेतून आशाताई कुलकर्णी यांच्या साथीने डॉ. निशिगंधा वाड ट्रस्ट आणि आशिदा ट्रस्ट यांनी संयुक्तिक उपक्रम राबविला. एकनाथ आव्हाड, आप्पासाहेब पडळकर यांनी या कामी महत्त्वाची भूमिका निभावली.
रक्तदान शिबिर
मुंबई : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनीदेखील रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रकाचे वितरण करण्यात आले.
रुग्णवाहिकांचे लोकार्पण
मुंबई : मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या ममता दिनानिमित्त जाणीव संस्थेच्या वतीने दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. मलबार हिल परिसरातील एमटीएनएल कार्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी जाणीव संस्थेचे पदाधिकारी, खासदार अरविंद सावंत, इंडियन ऑइल कार्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.