मुंबई : जाहिरात क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या ब्राईट आऊटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आता डिजिटल क्षेत्रातदेखील पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल क्षेत्राला गवसणी घालू इच्छिणाऱ्या या कंपनीने समाजमाध्यमांद्वारे व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या क्षेत्रातही आम्हास सहकाऱ्यांच्या मदतीने यश संपादन करता येईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संचालक डॉ. योगेश लखानी यांनी त्यांच्या २५ सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केला आहे.
डॉ. योगेश लखानी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, डिजिटल माध्यमांचा विचार करता मी आता ब्रियांते नावाची कंपनी सुरू केली आहे. एका स्पॅनिश पार्टनरच्या मदतीने ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. स्पॅनिश भाषेत ब्राईटचा अर्थ ब्रियांते असा होतो. जागतिकस्तरावर ही कंपनी काम करणार आहे.
१ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही कंपनी डिजिटल सोशल मीडिया, टीव्ही, प्रिंट, रेडिओ आणि रिटेलच्या क्षेत्रात काम करणार आहे. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत मला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मी आठ हजाराहून अधिक जास्त चित्रपटांचे काम केले आहे. आमच्या कंपनीचे मुंबईत एक हजाराहून अधिक होर्डिंग्ज आहेत. एक हजार पाचशेहून अधिक आमच्या कंपनीचे कॉर्पोरेट क्लायंट आहेत. आता आमच्या होर्डिंग्जला डिजिटल करणार आहोत. आयपीओत काम करीत आहोत.
कोरोना काळात एक दिवसाआड दररोज सुमारे दोनशे लोकांना जेवण दिले जात होते. आरोग्य क्षेत्राचा विचार करता आमचे मातोश्री जयाबेन चॅरिटेबल ट्रस्टचे डायलिसिस केंद्र तीन पाळ्यांमध्ये सुरू होते. तेथे रुग्णांवर मोफत डायलिसिस केले गेले. गेल्या तीन वर्षांत आम्ही दहा हजार रुग्णांना येथे सेवा दिली आहे. ज्यांना औषधांची गरज होती, ज्यांना उपचाराची गरज होती; अशांना आरोग्याशी संबंधित मदत केली. ज्यांना खरंच पैशांची गरज आहे, ज्यांची नोकरी गेली आहे आणि घर चालविणे कठीण झाले आहे अशांना मदत केली. कोरोना काळात माझ्याकडून हे काम केले जात असतानाच माझ्या आई-बाबांचे निधन झाले. माझ्या आईच्या निधनानंतर मी तिचे डोळे, त्वचा आणि अवयव दान केले.
कोरोना काळात काम करताना मी माझ्या एकाही कर्मचाऱ्याला कामाहून काढले नाही. व्यवसायाला उतरती कळा लागली. मात्र मी कुणालाही निराश केले नाही. ज्यांना आधाराची गरज आहे, अशांना आधार देत मदत केली. मानसिक धीर दिला. मी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. मला कोणतेही व्यसन नाही. माझे आई, बाबा, पत्नी, मुलगा आणि माझे सहकारी यांच्या सहकार्याने उत्तरोत्तर यश मिळत गेले आहे. मी चौदा तासाहून अधिक काम करतो.
बॉलिवूडमधील ९० टक्के सेलिब्रेटी माझे मित्र आहेत. यंदाचा वाढदिवस मी वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि अंधाश्रमात साजरा करणार आहे. येथे त्यांना मदत करीत त्यांना जेवण दिले जाणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला असून, यातून सावरण्यासाठी सहा महिने किंवा एक वर्ष लागू शकते, असे देखील डॉ. योगेश लखानी यांनी सांगितले.