मुंबई : कामगारा व प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे, असा कृती समितीचा आग्रह असून, संप मागे घेण्याच्या त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांना केले. आपली बांधिलकी प्रवाशांशी आहे. आधी एसटी रस्त्यावर आणा, मग बाकीचे बघू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी २२ कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. शरद पवार यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब, विभागाचे अधिकारी आणि कृती समितीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांनी एसटीचा संप मिटविण्यासाठी कृती समितीमध्ये एकमत घडविले. कृती समितीने सरकारच्या निर्णयात ज्या काही त्रुटी दाखवून दिल्या आहेत, त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी परिवहन मंत्र्यांनी दाखवली.
कामगारांचे हित जपणाऱ्या संघटनांच्या काही नेत्यांनी आम्ही ऐकणारच नाही, अशी भूमिका मध्यंतरी घेतल्याने कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा. त्यामुळेच दोन महिने या चर्चेत गेले. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
ज्या कर्मचाऱ्यांवर आंदोलनादरम्यान कारवाई केली आहे, त्यावर एसटी सुरू झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. - अनिल परब, परिवहनमंत्री
विलीनीकरणबाबत समितीचा अहवाल सकारात्मक येईल, असे वाटते. परंतु कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा फायदा दिला जावा. - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटना