ब्रिटनचे उच्चायुक्त पडले वडापावच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:43+5:302021-09-12T04:09:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पडतो. एकदा जिभेवर त्याची चव रेंगाळली की ...

Britain's High Commissioner fell in love with Vadapav | ब्रिटनचे उच्चायुक्त पडले वडापावच्या प्रेमात

ब्रिटनचे उच्चायुक्त पडले वडापावच्या प्रेमात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पडतो. एकदा जिभेवर त्याची चव रेंगाळली की एक काय दोन काय, मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत आस्वाद घेतला जातो. अशाच आस्वादाचा मोह ब्रिटनच्या उच्चायुक्तांनाही अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेटवेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत व्यापार, आरोग्यसेवा आणि हवामानविषयक कृतीमध्ये यूके आणि महाराष्ट्राच्या संबंधांवर चर्चा केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर गणेश चतुर्थीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गणेशमूर्ती कार्यशाळेला त्यांनी भेट दिली.

या दरम्यानच्या काळात त्यांनी व्हिक्टोरिया इलेक्ट्रिक बगीच्या सफरीचा आनंद लुटला. दरम्यान, मुंबईची भ्रमंती करीत असताना त्यांना वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात वडापाववर मनसोक्त ताव मारला. दरम्यान, याचे फोटो शेअर करीत त्यांनी वडापावविषयीचे प्रेम व्यक्त करत मराठीत ‘लय भारी’ अशी दाद देत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

डबेवाल्यांनी घेतली भेट

मुंबईच्या डबेवाल्यांनीही ॲलेक्स एलिस यांची भेट घेत त्यांचे मुंबईत स्वागत केले. डबेवाल्यांतर्फे त्यांना आठवण म्हणून डबा भेट देण्यात आला. मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही घेतली. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव हे गुण आपल्याकडून शिकण्यासारखे आहेत, अशा शब्दांत त्यांनी डबेवाल्यांचे कौतुक केले.

Web Title: Britain's High Commissioner fell in love with Vadapav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.