ब्रिटिशकालीन नोकरशाही व्यवस्था आता बदलण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:06 AM2019-12-19T05:06:32+5:302019-12-19T05:06:54+5:30
गोपीचंद हिंदुजा : ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करणे शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२४ सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करणे सहजपणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने ब्रिटिशकालीन नोकरशाही व्यवस्था बदलायला हवी व अधिक वेगाने काम करावे, असे हिंदुजा उद्योगसमूहाचे सहअध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी मंगळवारी सांगितले.
एका अर्थविषयक कार्यक्रमात ते म्हणाले की, हिंदुजा उद्योगसमूहाला भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी या क्षेत्रातील अनेक अडथळे दूर झाले पाहिजेत. भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी मोदी सरकार योग्य प्रयत्न करत आहे. मोदी यांना चांगली दूरदृष्टी आहे, पण त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक जलदगतीने काम करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात गोपीचंद हिंदुजा म्हणाले की, भारतामध्ये अजूनही ब्रिटिशकालीन नोकरशाहीच अस्तित्वात आहे. त्याउलट ब्रिटनने मात्र आपल्या देशात जुन्या नोकरशाहीचे स्वरूप आता पार बदलून टाकले आहे. भारतातील नोकरशाहीमध्ये आपण आजच्या काळाला अनुकूल असे कोणते बदल करता येतील, याकडे सर्वप्रथम लक्ष दिले पाहिजे. पाच सहा वर्षांपूर्वी हिंदुजा उद्योगसमूहाला भारतामध्ये २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न सुरू केले असता, भारतामध्ये खूप अडथळे व व्यवसायपूरक वातावरण नसल्याचे लक्षात आले. उद्योगांसाठी उत्तम वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तेव्हा आता पूर्वीचे वातावरण बदलेल, असे आम्हाला वाटले. आता तरी हे बदल वेगाने व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
केंद्र सरकारने शब्द पाळावा
गोपीचंद हिंदुजा म्हणाले की, जगभरातून भारतामध्ये गुंतवणूक होण्यास मोठा वाव आहे. हिंदुजा उद्योगसमूहाला भारतामध्ये जास्तीतजास्त गुंतवणूक करायला नेहमीच आवडेल. मात्र, केंद्र सरकारने उद्योजकांना दिलेला शब्द पाळावा, इतकीच अपेक्षा राहिल. यावेळी हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले की, भारतामधील व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आली पाहिजे. मात्र, त्यालाही काही बंधने हवी. नोकरशाहीचे स्वरूपही बदलणे आवश्यक आहे.