ब्रिटिशकालीन उत्सव

By Admin | Published: March 11, 2017 08:27 PM2017-03-11T20:27:37+5:302017-03-11T20:28:00+5:30

हे देवस्थान पूर्वी खोतांच्या ताब्यात होते. मात्र, १९७७पासून गावच्यावतीने देवस्थानचा ट्रस्ट करण्यात आला.

British celebration | ब्रिटिशकालीन उत्सव

ब्रिटिशकालीन उत्सव

googlenewsNext


कोकणातील शिमगोत्सव खूपच प्रसिध्द आहे. त्यामुळे याकाळात अनेक मुंबईकर कोकणात येतात व या उत्सवाचा आनंद लुटतात. शिमग्यातील खेळे, नमन, पालखी नृत्य, पालखी महोत्सव हे सारं अगदी मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवण्यासारखंच असतं. रत्नागिरीतील ग्रामदैवत श्रीदेव भैरीचा शिमगोत्सवही प्रसिध्द असून, या शिमगोत्सवाला अनेक वर्षांचा इतिहास आहे.
या शिमगोत्सवाला ब्रिटिशकालीन परंपरा आहे. ब्रिटिशकाळात श्रीदेव भैरीच्या पालखीला पोलिसांकडून सलामी दिली जायची. ही प्रथा आजही पाळली जाते. रत्नागिरीच्या बारा वाड्यांतील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा शिमगोत्सव साजरा करतात. भैरीचे हे मंदिर पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. हे देवस्थान पूर्वी खोतांच्या ताब्यात होते. मात्र, १९७७पासून गावच्यावतीने देवस्थानचा ट्रस्ट करण्यात आला. पूर्वी पेठकिल्ला ते काजरघाटी असा परिसर होता. या बारावाड्यांचं हे ग्रामदैवत आहे. या शिमगोत्सवाची एक पध्दत ठरलेली आहे. होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरीची पत्नी देवी जोगेश्वरी हिचे निमंत्रण येते. निमंत्रण भैरी मंदिरात आल्यानंतर रात्री १२ वाजता होळी पौर्णिमेच्या दिवशी भैरीबुवा जोगेश्वरीला भेटण्यासाठी जातो. तिची भेट झाल्यानंतर सूरमाडाची होळी उभी करण्यासाठी बाहेर पडतो. तिथून संपूर्ण वाड्यातून फिरून दुपारी ज्याठिकाणी होळी उभी होते, तेथे भैरीची पालखी उभी राहते. झाडगाव येथील सहाणेसमोर होळी उभी केली जाते.
ज्या ठिकाणी भैरीची पालखी जात नाही, त्याठिकाणी देवाचे निशाण जाते. त्याला ‘धूळवड’ असे म्हटले जाते.
रात्रभर हा सोहळा सुरु असतो. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याची सांगता होते आणि त्यानंतर भैरी सहाणेवर स्थानापन्न होतो. रोज रात्री भैरीची पालखी खेळवण्याचा कार्यक्रम होतो. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी जाते. रंगपंचमीदिवशी सशस्त्र पोलीस भैरीबुवाला सलामी देतात. त्यानंतर पालखी रंगपंचमीच्या कार्यक्रमाला बाहेर पडते. जोगेश्वरीची भेट झाल्यानंतर रंगपंचमीला सुरुवात होते आणि ज्या-ज्या ठिकाणी ही पालखी जाते, त्यानंतर तेथील रंगपंचमीचा कार्यक्रम संपतो. रंगपंचमीला सुरुवात झाल्यानंतर ही पालखी श्रीदेवी नवलाई-पावणाई येथील मंदिरात जाते. तेथे गाऱ्हाणे होऊन ही पालखी शहर पोलीस ठाण्यात (चावडी) येते. तेथे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पालखीचे स्वागत केले जाते. तेथून पालखी धनजीनाका, राधाकृष्णनाका, रामनाका, गोखलेनाका, धमालनीचा पार, मुरलीधर नाकामार्गे रात्री ११.३० वाजता आपल्या मंदिरात पोहोचते. रात्री १२ वाजता बारावाड्यांचे गाऱ्हाणे होऊन कार्यक्रम संपन्न होतो. तत्पूर्वी फाक पंचमीपासून रत्नागिरीत येणारी प्रत्येक पालखी ही भैरीबुवाला भेटल्याशिवाय जात नाही.

शिमगोत्सवात महत्त्वाचा क्षण असतो तो पालखी भेटीचा सोहळा. रत्नागिरीतील सडामिऱ्या व जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई, पावणाई, म्हसोबाच्या पालख्या भैरी भेटीसाठी येतात. हा सोहळा खूपच रंगतदार असतो.
विहार तेंडुलकर, रत्नागिरी

Web Title: British celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.