Join us

ब्रिटिशांचे दारूगोळा भरलेले डबे पाडले

By admin | Published: August 14, 2015 11:32 PM

पालघरच्या आंदोलनात झालेल्या ब्रिटिशांच्या बेछूट गोळीबारात बळी पडलेल्या पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रतिशोॅध घेण्यासाठी मुंबईहून दारूगोळा भरून निघालेली लष्कराची गाडी

पालघर : पालघरच्या आंदोलनात झालेल्या ब्रिटिशांच्या बेछूट गोळीबारात बळी पडलेल्या पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रतिशोॅध घेण्यासाठी मुंबईहून दारूगोळा भरून निघालेली लष्कराची गाडी पाडायची ठरवून जय्यत तयारीनिशी रात्री पंचाळीच्या पुलाजवळ जमून रुळांच्या प्लेट्स व नटबोल्ड उखडून काढले. धाडधाड करीत आलेल्या वाफेच्या इंजिनासह सर्व डबे घसरून पुलाखाली पडले. यानंतर, काळोखात मिळेल त्या वाटेने धूम पळत त्यांनी सातपाटी गाठले. किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या नौकेत चढून थेट समुद्र गाठला. या पराक्रमाचा ग्रामस्थांसह नातेवाइकांना जराही थांगपत्ता लागू न देता हुतात्म्यांच्या बलिदानाचा बदला घेतल्याचे ८९ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक विनायक विठ्ठल म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले.सातपाटीच्या खारीबावजवळील हे स्वातंत्र्यसैनिक वृद्धापकाळाने सध्या अंथरुणाला खिळले असले तरी कणखर आवाजात जुन्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. पालघरच्या आंदोलनात सातपाटीतील हुतात्मा काशिनाथभाई पागधरे आणि नांदगावचे गोविंद ठाकूर यांचा ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याने त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याची शपथ त्यांच्या मित्रांनी घेतली. त्यानुसार, मुंबईहून गुजरातकडे लष्करी दारूगोळा भरून जाणारी ट्रेन पाडण्याचा कट कार्यकर्त्यांनी आखला. ज्येष्ठ नेते नारायण दांडेकर यांनी मुंबईहून लष्कराची गाडी के व्हा सुटणार, याचा तपास सुरू केला. तर नांदगावच्या यादव पाटील यांनी रूळ उखडण्याचे तंत्र आत्मसात केले. नरोत्तम पाटील यांनी पंचाळी पुलाच्या परिसराची व परिस्थितीची पाहणी केली. २६ आॅक्टोबरला ही गाडी मुंबईहून सुटणार असल्याचा निरोप नारायण दांडेकरांनी कार्यकर्त्यांना पाठविला आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागले. सातपाटीवर नारायण दांडेकरांच्या नेतृत्वाखाली विनायक म्हात्रेंसह ८-१० तरुणांनी संध्याकाळी आपल्या मच्छीमारी नौका मासेमारीला जाण्याच्या उद्देशाने किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या. रात्रीच्या अंधारात सर्व जण खाडी ओलांडून खारेकुरणच्या मार्गाने पंचाळी पुलाकडे जमले. परंतु, बराच वेळ झाला तरी रेल्वे रूळ उखडण्यात वाकबगार असलेला यादव पाटील वेळेवर पोहोचला नसल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. शेवटी उशीर झाल्याने रात्री १२ वा.च्या दरम्यान सातपाटीवरील उपस्थित कार्यकर्त्यांनी रुळांचे नटबोल्ट काढायला सुरुवात केली. या वेळी गाडी जवळ येत असल्याचा आवाज त्यांच्या कानात शिरला. विजेच्या वेगाने त्यांनी रुळांच्या प्लेट्स काढून फेकून दिल्या. सर्व डब्यांमध्ये दारूगोळा असल्याने ते लांब उभे राहिले. गाडी पुलावर पोहोचली आणि वाफेच्या इंजिनासह धडाडधूम करीत एकेक डबे पुलाखाली कोसळू लागला. मोहीम यशस्वी झाल्याचे पाहताच काळोखात मिळेल त्या वाटेने सर्वांनी सातपाटीचा समुद्रकिनारा गाठला.