मुंबई : जी दक्षिण विभागाच्या गावडे चौक, सेनापती बापट मार्गावरील दीपक सिनेमाजवळ ब्रिटिशकालीन १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीची मोठी दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्यातील गळती दुरुस्ती पथकाने अहोरात्र प्रयत्न करून विहित मुदतीच्या १२ तास आधीच पूर्ण केले. ५ ठिकाणी आढळलेली गळती दुरुस्ती करण्यात आली. यामुळे आता वाया जाणाऱ्या लाखो लीटर पाण्याची बचत होईल.
दुरुस्ती करताना त्यावर दोन मॅनहोल लावण्यात आले आहेत. यापुढे जलवाहिनी दुरुस्ती करावी लागली तर, मोठे खोदकाम न करता तसेच वाहतुकीस अडथळा न येता या मॅनहोलद्वारे आत जाऊन दुरुस्ती करणे सोपे हाेईल. जमिनीपासून २५ ते ३० फूट खोलवर व जलवाहिनीच्या आत २५ फुटांवर असलेल्या मोठ्या गळतीची दुरुस्ती करण्याचे आव्हान होते. या कामासाठी कदाचित ६ ते ७ दिवस परिसरातील पाणीपुरवठा बंद करावा लागला असता. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री, जेसीबी आणि पोकलेन यांच्या सोबतीला एअर प्लाझ्मा कटिंग मशीनमुळे जलवाहिनीत पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही मॅनहोल कापणे शक्य झाले तसेच वेळेची बचत झाली. सीसीटीव्ही क्राऊलर कॅमेरामुळे जलवाहिनीच्या आत प्रवेश करून निरीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली हाेती. एअर ब्लोअर संयंत्रामुळे जलवाहिनीच्या आत हवेचा पुरवठा करण्यात आला हाेता.
मध्यरात्री दाेन वाजताच काम पूर्णब्रिटिशकालीन जलवाहिनीला मोठी गळती असल्याचे १८ नोव्हेंबर रोजी निदर्शनास आले होते. २ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ३ डिसेंबर रोजी दुपारी २ या कालावधीत काम हाती घेण्यात आले. गळती दुरुस्ती पथकाने ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता दुरुस्ती पूर्ण केली.