पालिकेच्या तोतया अधिकाऱ्यांनी तोडले ब्रिटिशकालीन झाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 03:29 AM2021-02-08T03:29:22+5:302021-02-08T03:29:36+5:30
पाच जणांना अटक, जाहिरात लावण्यासाठी ठरत होते अडथळा
मुंबई : जाहिरात लावण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या ब्रिटिशकालीन वडाच्या झाडावर पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
स्थानिकांनी या प्रकरणाचे ट्विट करून याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत बुधवारी दुपारी स्वतः झाड कापलेल्या ठिकाणी जावून परिस्थितीचा आढावा घेतला.
स्थानिकांनी घडलेला प्रकार सांगताच, त्यांनी याबाबत विचारणा केल्यावर महानगरपालिकेने असा कुठलाही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट झाले. अशात झाड कापणारे पालिका कर्मचारी नसल्याचे समजताच, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणी हिरालाल सेवकराम दर्शन आणि मोहम्मद शफीक उर्फ अब्दुल इकबालसह ५ जणांना माहीम परिसरातून अटक केली. बॅनर लावल्यानंतर हे झाड बॅनरच्या आड येत असल्याने कमी पैसे मिळत होते. त्यामुळे त्यांनी झाड कापल्याची माहिती पोलिसांना दिली.
मलबार हिल पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिल परिसरातही या लोकांनी अशाच प्रकारे झाडे कापल्याच समोर आले असून मलबारहिल पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे.