ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:37 AM2019-03-19T05:37:06+5:302019-03-19T05:37:24+5:30

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेने पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे.

 British Hancock Bridge Waiting For Reconstructio | ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेने पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. या प्रकरणी सर्वत्र तीव्र पडसाद उमटताच, महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट करण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी दुरुस्तीसाठी हिरवा कंदील मिळालेल्या कर्नाक बंदर व हँकॉक पुलाचे काम मात्र आजही रखडलेलेच आहे.
माझगाव येथील १४० वर्षे जुना हँकॉक पूल आणि मशीद बंदर येथील दीडशे वर्षांचा कर्नाक बंदर हे दक्षिण मुंबईतील दोन महत्त्वाचे पूल आहेत. ब्रिटिशकालीन असलेल्या या पुलांना आता धोकादायक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी हँकॉक पूल २०१६ मध्ये पाडण्यात आला, पण गेली तीन वर्षे या पुलाचे काम विविध वादात रखडले. कर्नाक बंदर पूलही धोकादायक असल्याने तातडीने पाडण्याची गरज आहे.
मात्र, हँकॉक पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कर्नाक पुलाचे
काम महापालिकेसाठी आव्हानच ठरणार आहे. या पुलांच्या
मार्गात हँकॉक पुलाच्या प्रवेशद्वारावर काही झोपड्या असल्याने
पुलाच्या कामात अडथळा
निर्माण झाला. गेल्या महिन्यात महापालिकेने काही झोपड्या पाडण्याची कारवाई केली होती. हँकॉक पुलासाठीचे खोदकाम
अंतिम टप्प्यात आहे, असे पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

सहा महिन्यांत उभा राहील हँकॉक पूल
पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून झोपड्या पाडण्यास विलंब होत होता. हा अडसर दूर झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर, रेल्वेमार्फत कर्नाक बंदर पूलही पाडण्याचे काम सुरू करता येईल, असे पूल विभागातील सूत्रांनी सांगितले.
कंत्राट दिले, पण
काम नाही
कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी महापालिकेने आॅगस्ट, २०१७ मध्ये कार्यादेश दिले आहेत. हँकॉक पुलाचे काम २०१९ अखेरीपर्यंत पूर्ण होताच कर्नाक बंदरचे काम सुरू होऊ शकेल. मात्र, या विलंबामुळे हँकॉक पुलाच्या कामाचा खर्च ५१.७० कोटी, तर कर्नाक पुलाचा खर्च ४१.२७ कोटींवर पोहोचला आहे.
असा झाला विलंब
सँडहर्स्ट येथील हँकॉक पूल मोडकळीस आल्यामुळे रेल्वेने तो तोडला. नवीन पूल बांधण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराची निवड केली. मात्र, पहिल्या ठेकेदाराची निवड न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द केल्यानंतर, दुसऱ्यांदा निविदा मागवून नवीन ठेकेदाराची निवड करण्यात आली.

 


सीएसएमटी स्थानकातील पादचारी पूल धोकादायक?


मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेनंतर पादचारी पुलांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील मशीद दिशेकडील पादचारी पूल धोक्याच्या स्थितीत आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा पूल सुरक्षित असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.
सीएसएमटी स्थानकावरील मशीद दिशेकडील पादचारी पूल लांब पल्ल्याच्या गाड्यांचे फलाट आणि उपनगरीय लोकल मार्गिकेवरून जातो. या पुलाची उभारणी १९८४ साली करण्यात आली होती. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या पुलाचा वापर महात्मा जोतिबा फुले मंडई, पोलीस आयुक्त कार्यालय, अंजुमन इस्लाम, आझाद मैदान, कामा रुग्णालय, गोकूळदास तेजपाल रुग्णालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी केला जातो. त्यामुळे या पादचारी पुलावर कोणतीही दुर्घटना होण्याआधी त्याची पूर्णत: दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. मध्य रेल्वे मार्गावरील पुलांचे स्ट्रक्चर आॅडिट एका वर्षाने होते. सीएसएमटी स्थानकावरील पादचारी पुलाचे स्ट्रक्चर आॅडिट झाले असून हा पादचारी पूल सुरक्षित आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी दिली.
अंधेरी येथील पादचारी पूल कोसळणे, एलफिन्स्टन रोड येथील चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू होणे अशा घटनांच्या आठवणी ताज्या असताना मुंबईत नवीन दुर्घटना होते, याला प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाचे हे अपयश आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अनेक पूल शंभरी गाठणार आहेत. त्यामुळे या पुलांची बांधणी पुन्हा करणे आवश्यक असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी सांगितले.

बीकेसी ते पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाचे काम जुलैपर्यंत मार्गी लागणार 

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, जुलै महिन्यापर्यंत ते मार्गी लागेल. महत्त्वाचे म्हणजे हा उड्डाणपूल सेवेत दाखल झाल्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथून पूर्व द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी सायनला वळसा घालण्याची किंवा सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडची गरजही भासणार नाही. उलट थेट उड्डाणपुलामार्गे द्रुतगती मार्ग गाठता येईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे बीकेसी ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत मध्य रेल्वे मार्गावरून उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर होते. दरम्यान, १७ मार्च रोजी सकाळी मध्य रेल्वेच्या सायन आणि
कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यानच्या मार्गावर चार गर्डर बसविण्याचे
काम पूर्ण करण्यात आले असून,
१८ मार्च रोजी सकाळी आणखी
दोन गर्डर बसविण्याचे काम
पूर्ण करण्यात आले आहे. अशा प्रकारे बीकेसी ते पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलासाठी एकूण सहा गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्प खर्च २०० कोटींवर

वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉक, मिठी नदी, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मध्य रेल्वे, व्ही. एन. मनकीकर मार्ग ते चुनाभट्टी रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्ग, सोमय्या ट्रस्ट मैदान यांना हा प्रकल्प मार्ग ओलांडतो.
काम पूर्ण झाल्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलाशी थेट जोडणी शक्य झाली आहे. पूर्व उपनगरातील वाहतुकीला यामुळे बळकटी मिळेल. तसेच वांद्रे, सायन, कुर्ला, अंधेरीसह लगतच्या परिसरालाही फायदा होईल.
सुरुवातीला प्रकल्पाचा एकूण खर्च १५६ कोटी रुपये होता. मात्र प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आणि तो खर्च २०० कोटींवर गेला.

Web Title:  British Hancock Bridge Waiting For Reconstructio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.