ब्रिटिश उच्चायुक्त पडले वडापावच्या प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:48+5:302021-09-12T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पडतो. एकदा जिभेवर त्याची चव रेंगाळली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पडतो. एकदा जिभेवर त्याची चव रेंगाळली की एक काय दोन काय, मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत आस्वाद घेतला जातो. ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत व्यापार, आरोग्यसेवा आणि हवामानविषयक कृतीमध्ये यूके आणि महाराष्ट्राच्या संबंधांवर चर्चा केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. त्याशिवाय काही आघाडीच्या उद्योजकांशीही चर्चा केली. त्यानंतर गणेश चतुर्थीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गणेश मूर्ती कार्यशाळेला भेट दिली.
या दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. जागतिक विद्युत वाहन दिवसाचे औचित्य साधत त्यांनी व्हिक्टोरिया इलेक्ट्रिक बग्गीच्या सफरीचा आनंद लुटला. मुंबईची भ्रमंती करीत असताना त्यांना वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही. गेट वे ऑफ इंडिया परिसरात त्यांनी वडापाववर मनसोक्त ताव मारला. त्याचे फोटो शेअर करीत त्यांनी वडापाव विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे मराठीत ''लय भारी'' अशी दाद देत त्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्यांचा हा फोटो सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या ट्विटला २१ हजारांहून अधिक लाईक आणि १५०० रीट्विट मिळाले आहेत. मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावास अधिकाऱ्यांनीही त्यांच्या ट्विटला उत्तर देत ''पुढच्या वेळी आपण जेव्हा मुंबईत याल आणि वडापाव खायची इच्छा होईल तेव्हा अमेरिकेच्या कॉन्सुल जनरल रांझमध्ये सामील व्हा,'' असे निमंत्रणही दिले आहे.
.......
डबेवाल्यांनी घेतली भेट
मुंबईच्या डबेवाल्यांनीही ॲलेक्स एलिस यांची भेट घेत त्यांचे मुंबईत स्वागत केले. डबेवाल्यांतर्फे त्यांना आठवण म्हणून डबा भेट देण्यात आला. मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही घेतली. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव हे गुण आपल्याकडून शिकण्यासारखे आहेत, अशा शब्दांत त्यांनी डबेवाल्यांचे कौतुक केले.