मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या स्मृती शताब्दी वर्ष सुरू आहे. दि. १ ऑगस्ट २०२० ते १ ऑगस्ट २०२१ हे वर्ष लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे औचित्य साधून मराठी रंगभूमीवर गाजलेले, विश्राम बेडेकर लिखित ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीवर सुवर्णपान ठरलेल्या ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाची निर्मिती ‘अभिजात’ व ‘श्री आर्यादुर्गा क्रिएशन’ यांनी केली आहे. या नाटकात नयना आपटे, सुनील जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, अथर्व गोखले, अनुष्का मोडक, जगदीश जोग आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाच्या प्रसारणासह, लोकमान्यांच्या घराण्यातील त्यांचे पणतू व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांची मुलाखतही प्रसारित होणार आहे. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्षानिमित्त १ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ३१ जुलै रोजी दुपारी १:३० व रात्री १०:३० वाजता या नाटकाचे प्रसारण होणार आहे. डॉ. दीपक टिळक यांची मुलाखत २८ जुलै व १ ऑगस्ट या दोन्ही दिवशी प्रसारित होणार आहे.