Join us

"पवारांना मोडणारा या महाराष्ट्रात जन्मला, फडणवीसांनी अशक्य ते शक्य केलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:35 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन सदाभाऊ यांनी देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणत पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं म्हटलं

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पुन्हा पक्षबांधणीसाठी शरद पवार यांनी महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात केली आहे. येवला येथे सभा घेत बंडखोरांवर टीका केली. त्यानंतर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. सदाभाऊंच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते संतप्त झाले. सदाभाऊंना दोन्ही गटाकडून इशारा देण्यात आला. मात्र, आजही शरद पवारांबद्दलचे आपले मत ठाम असल्याची भावना सदाभाऊ खोत यांनी पुन्हा व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन सदाभाऊ यांनी देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणत पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं म्हटलं. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आधी रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर प्रहार केला. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनीही थेट सदाभाऊ खोत यांची लायकी काढली आहे. मात्र, शरद पवार यांच्यासंदर्भातील मतावर आपण ठाम असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल केला.

शरद पवारांचा मोठा दरारा होता, एवढा दरारा होती की अनेक मोठ्या संस्थेवर तेच प्रमुख असायचे. त्यांचा एवढा दरारा होता की, किती माणसं गायब झाली असतील याचा पत्ता नाही, असेही खोत यांनी म्हटलं. तसेच, माझ्याकडे लय मोठी यादी आहे, यांनी कशा-कशा संस्था घेतल्या, कसं कोणाला दाबलं याची यादी माझ्याकडे असून वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेन, असेही खोत यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीसांना मी कालही म्हटलं, भारा विस्कटलेला आहे, पेंड्या वेगळ्या केलेल्या आहेत, जे कुणालाही जमलं नाही ते ऐतिहासिक काम तुम्ही केलं. म्हणजेच, पवारांनाही मोडू शकतो, मोडणारा या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, हे महाराष्ट्राने पाहिलं. 

आम्हाला वाटायचं ते अशक्य आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी ते शक्य करुन दाखवलं. आमच्यासारख्या चळवळीतील लोकांना, ज्यांनी मार खाल्ला त्यांना हे याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मिळाले, असे म्हणत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवर भाष्य केलं. तसेच, शरद पवारांना टक्कर देणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही केलं. 

देवेंद्र फडणवीस हे चाणाक्य आहेत, त्यांनी प्रस्थापितांच्या वाड्याला हादरा दिला. मी म्हणत नाही की, यांचा वाडा पडला. पण, यांचे बुरूज ढासळले. सरदार सैरावैरा पळायला लागले आणि सेनापती गावाकडे दडायला यायला लागले, यांना आता गाव आठवलं, गावाकडची लोकं दिसायली, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसह राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. खोत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा प्रहार केला. 

सदाभाऊंना रोहित पवारांचा इशारा

सदाभाऊ खोत यांना मला सांगायचंय की, मर्यादेत राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही काय इथं शांत बसणार आहोत का?, मर्यादेत राहावा, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशाराच दिला आहे.  

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीससदाभाउ खोत राष्ट्रवादी काँग्रेस