सव्वा चार कोटींचे हिरे घेऊन ब्रोकर पसार; बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: May 18, 2024 01:40 PM2024-05-18T13:40:17+5:302024-05-18T13:40:50+5:30
सोबत इतके वर्ष असलेल्या व्यावसायिक नात्यामुळे गोंडालिया यांनी झांगड पावती बनवत त्याला त्याने मागितले तितके हिरे दिले. मात्र त्याने त्याचे पैसे दिले नाही तसेच मोबाईल बंद करून पळून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: सव्वा चार कोटी रुपयांचे हिरे घेऊन एक ब्रोकर पसार झाला. हिरे व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकत अवघ्या महिन्याभरात त्याने हा प्रकार केला असून याविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
मालाडला राहणारे तक्रारदार चिरागदास गोंडालिया (३२) हे हिरे व्यापारी असून बीकेसीच्या भारत डायमंड बोर्समध्ये त्यांचे कार्यालय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ध्रुवल तेजाणी (२७) याला गेल्या ७ वर्षापासुन ते ओळखतात तसेच हिऱ्यांचा व्यवहारही करतात जो त्यांनी अद्याप पूर्ण केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ६ एप्रिल रोजी तेजाणी हा त्यांच्या कार्यालयात आला आणि हिरे खरेदी करणारा एक चांगला व्यापारी असून त्याला चांगल्या प्रतीच्या हिऱ्यांची गरज आहे असे त्यांना सांगितले. तसेच या व्यवहारात तुम्हाला चांगला नफा होईल असेही आमिष त्याने दाखवले. त्याच्या सोबत इतके वर्ष असलेल्या व्यावसायिक नात्यामुळे गोंडालिया यांनी झांगड पावती बनवत त्याला त्याने मागितले तितके हिरे दिले. मात्र त्याने त्याचे पैसे दिले नाही तसेच मोबाईल बंद करून पळून गेला.
गोंडालिया यांनी केलेल्या चौकशी दरम्यान अन्य व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे त्याने फसवल्याचे तक्रारदाराला समजले. तेजाणीने जवळपास ४ कोटी २८ लाख ८ हजार ८५९ रुपयांचे हिरे घेऊन पळ काढला. त्यानुसार गोंडालिया आणि अन्य व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार मिळाल्यावर बीकेसी पोलिसांनी तेजाणी विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.