रेल्वे तिकिटांची दलाली अंगलट; सात महिन्यांत ३१७ दलालांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:19 AM2023-11-13T09:19:51+5:302023-11-13T09:20:01+5:30
३.४२ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येक जण गावाकडची वाट धरतो. विशेषतः रेल्वेला प्राधान्य दिले जाते, परंतु चार महिने आधी तिकीट काढूनही कन्फर्म होत नाही. त्याचा गैरफायदा घेत दलाल रेल्वे प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट पैसे आकारतात. मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) चांगलाच दणका दिला आहे. सात महिन्यात ३१७ दलालांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या आरपीएफने आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी तिकीट दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपूटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात हे छापे टाकण्यात आले. चालू वर्षात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दलालीच्या २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात येऊन आतापर्यंत ३१७ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली असून, त्यांना ३.४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे
मध्य रेल्वेच्या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू वर्षात एकट्या मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अवैध धंदेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील आरपीएफने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक केली, नागपूर विभागात ३६ गुन्ह्यांसह ४१ जणांना अटक, सोलापूर विभागात ८ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आली.