Join us  

अनधिकृत रेल्वे तिकिटांची दलाली दुपटीने वाढली

By admin | Published: August 08, 2016 3:29 AM

रेल्वे तिकिटांची अनधिकृतपणे तिकीट विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली असून, पश्चिम रेल्वेने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे.

मुंबई : रेल्वे तिकिटांची अनधिकृतपणे तिकीट विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली असून, पश्चिम रेल्वेने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल ९९७ दलालांना अटक करण्यात आली. मागील वर्षातील याच तीन महिन्यांशी तुलना केल्यास त्यात मोठी वाढ झाली आहे. मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी ई-तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मोठ्या वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. तर तिकीट मिळत नसल्यास प्रवाशांना हेरून अनधिकृत दलालांकडून लूटमार केली जाते. एकूणच दलालांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार अनधिकृतपणे रेल्वे तिकिटांची विक्री करणाऱ्या दलालांविरोधात विशेष कारवाई केली जात आहे. या कारवाईतून रेल्वे तिकिटांच्या गैरप्रकारात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यात पानपट्टी, चहाच्या दुकानातून तसेच मोबाइल शॉपमधून ई-तिकिटांची विक्री होत असल्याचे आढळल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून २0१६च्या एप्रिल महिन्यापासून सातत्याने कारवाई केली जात आहे. यात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तर ९९७ दलालांना अटक करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. २0१५च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५५३ दलालांना अटक करण्यात आली होती. यंदाच्या तीन महिन्यांत करण्यात आलेल्या कारवाईतून जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. ई-तिकिटांची अनधिकृत विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. पश्चिम रेल्वेने तीन महिन्यांत जवळपास ८0 लाखांपेक्षा जास्त रकमेची ई-तिकिटे जप्त केली. तर जुलै महिन्यात २0 तारखेला ११ लाख ७३ हजार रुपये किमतीची ३२५ तिकिटे हस्तगत करण्यात आली. वसई, विरार, मीर रोड, भार्इंदर, कांदिवली, बोरीवली, अंधेरी तसेच चर्नीरोड, मरिन लाइन्स या भागात सर्वांत जास्त ई-तिकिटे विकली जातात. तर वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रलसह अन्य काही स्थानकांत तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट मिळवून देणाऱ्या अनधिकृत दलालांनाही चाप लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.