Join us

व्यापाऱ्याचे ७७ लाखांचे हिरे घेऊन दलाल पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:12 IST

हिरे विक्री करुन देण्याच्या नावाखाली हिरे व्यापाऱ्यांचे ७७ लाखांचे हिरे घेवून दलाल पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली.

मुंबई : हिरे विक्री करुन देण्याच्या नावाखाली हिरे व्यापाऱ्यांचे ७७ लाखांचे हिरे घेऊन दलाल पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी पंकज शहा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.येथील एसव्ही रोड परिसरातील हिरे व्यापारी दिगेश कोटीया यांचा दागिने घडविण्याचा कारखाना आहे. त्याची पंकज शहासोबत ओळख झाली. ओळखीतून त्याने, सुरुवातीला काही व्यवहारातून कोटीया यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, हिरे विक्री करुन एकत्र पैसे देतो असे सांगून त्याने, कोटीया यांच्याकडून १४ फेब्रुवारीपर्यंत ४२ लाख ७९ हजार रुपयांचे हिरे घेतले. त्यानंतर पैसे देण्यास त्याने, टाळाटाळ सुरु केली. त्याचा फोनही लागत नव्हता. यामुळे कोटीया यांना संशय आला. त्यांनी, अन्य व्यापाºयांकडे विचारणा करताच, शहाने अनेकांना गंडा घातल्याचे कळले.यामध्ये त्यांचे मित्र कांतीभाई पडसाला यांना ३४ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समजताच, त्यांच्यासोबत त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या दोघांना एकूण ७७ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. शहाने मुंबईसह गुजरातमधील व्यापाºयांना गंडविल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे.