Join us  

घोटाळेबाज ठेकेदारांना पुलांचे कंत्राट बहाल

By admin | Published: May 03, 2016 4:10 AM

रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या ठेकेदारांवर महापालिकेने पुन्हा मेहेरनजर दाखविली आहे़ चौकशी समितीने कारवाईची शिफारस केली असताना हँकॉक पुलासह चार पूल बनविण्याचे

मुंबई: रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळेबाज ठरलेल्या ठेकेदारांवर महापालिकेने पुन्हा मेहेरनजर दाखविली आहे़ चौकशी समितीने कारवाईची शिफारस केली असताना हँकॉक पुलासह चार पूल बनविण्याचे कंत्राटच या कंत्राटदारांना बहाल करण्यात येणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे़ विशेष म्हणजे या ठेकेदारांनी पालिकेच्या अंदाजपत्रकाहून ३० ते ५० टक्के जादा बोली लावली आहे़ रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली आहे़ याप्रकरणी सहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे, त्यांची नोंदणी रद्द करुन त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु झाली़ मात्र एकीकडे या ठेकेदारांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु असताना त्यांना कोट्यवधींचे कंत्राट देण्याची तयारीही सुरु आहे़ एकूण चार पुलांच्या बांधकामासाठी पालिका २२७ कोटी रुपये मोजणार आहे़ मात्र कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा ३० ते ५० टक्के जादा बोली लावल्यानंतरही या कामाचे कंत्राट त्यांना देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे़ त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़ लोखंडवाला बॅक रोड जंक्शन अंधेरी येथे पूल बांधण्यासाठी जे़ कुमार इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड केली आहे. या कामासाठी पालिकेचे अंदाजपत्रक ३३ कोटी ७१ लाख रुपये आहे़ मात्र या कंपनीला पालिका ६० कोटी ७४ लाख रुपये देणार आहे़ सॅण्डहर्स्ट रोड येथील हँकॉक पुलाचे बांधकाम जे़ कुमार या कंपनीला देण्यात येणार आहे़ यासाठी ५५ कोटी १४ लाख रुपये पालिका मोजणार आहे़ या कामासाठी २७ कोटी ३६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते़ विक्रोळी येथे रेल्वेवर उड्डाणपूल बांधण्यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड केली आहे़ यासाठी पालिकेने ३० कोटी ४० लाख रुपये अंदाजपत्रक तयार केले होते़ मात्र पालिका आता ठेकेदाराला ५५ कोटी २४ लाख रुपये मोजणार आहे़ मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड केली आहे़ या कामाचा अंदाज ३० कोटी रुपये होता़ मात्र पालिकेने ५६ कोटी रुपये ठेकेदाराला देण्याची तयारी दाखविली आहे़ (प्रतिनिधी)रस्ते कामांच्या तक्रारीतही घोटाळारस्त्यांच्या कामात ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असताना पालिका प्रशासनाने केवळ १४ कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला आहे़ ३४ रस्त्यांच्या कामांमध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली होती़ या कामामुळे रस्त्यांवर परिणाम झाल्याचेही चौकशी समितीने नमूद केले होते़ त्यामुळे प्रशासनाने गुन्हा नोंदवितानाही घोटाळा केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे़वादळी चर्चेची शक्यता : या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीतच बोलू, असे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले़ तर प्रशासनाची भूमिका जाणून घेतल्यानंतर निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका शिवसेनेने घेतली.एकीकडे या ठेकेदारांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे त्यांना कोट्यवधींचे कंत्राट देण्याची तयारीही सुरु आहे़