Join us

‘भाई’ म्हणत वेटरला चोपले; शक्ती मिल सामूहिक बलात्कारातील आरोपीला पुन्हा अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:50 AM

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश जाधव याला शुक्रवारी पुन्हा अटक करण्यात आली आहे. राहत्या परिसरात स्वत:ला ‘भाई’ म्हणत, त्याने एका वेटरला बेदम मारहाण केली. याच मारहाणीच्या गुन्ह्यात आग्रीपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबई : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश जाधव याला शुक्रवारी पुन्हा अटक करण्यात आली आहे. राहत्या परिसरात स्वत:ला ‘भाई’ म्हणत, त्याने एका वेटरला बेदम मारहाण केली. याच मारहाणीच्या गुन्ह्यात आग्रीपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.सातरस्ता परिसरात बाळाराम कदम (४८) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते दादर पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास काम उरकून ते घरी परतत होते. तेव्हा बोरीचा मार्ग परिसरात जाधवसह आकाश गडकरी, सिद्धेश तोंडवळकर उर्फ गोपू यांची दारूची पार्टी सुरू होती. तेव्हा जाधवने कदम यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचा जाब विचारताच, ‘तू मला ओळखत नाहीस काय? मी इथला भाई आहे. तुझी हिंमत कशी झाली, मला जाब विचारण्याची,’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.पुढे पोलिसांकडे गेलास, तर जीवे ठार मारण्याची धमकी देत निघून गेले. कदम यांनी कसेबसे घर गाठले. कुटुंबीयांनी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांनी शुक्रवारी आग्रीपाडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी जाधवसह त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. अगावणे यांनी दिली.यापूर्वीही अटकशक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या घटनेदरम्यान जाधव हा अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. तेथून शिक्षा भोगून तो बाहेर पडला. बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना गुन्हेगारीकडे वळविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरची ही दुसरी अटक आहे.

टॅग्स :अटक