Join us

भाऊ, 19 व्या शतकापूर्वीची मुंबई नक्की होती कशी रे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:25 AM

१६०० सालाच्या दरम्यान मुंबई हा सात बेटांचा समूह होता. एकीकडे घारापुरी, उरण, मोरा, करंजा हा समुद्रालगतचा डोंगराळ प्रदेश, दुसºया बाजूला अरबी समुद्राचा त्याला पडलेला वेढा, तिसºया बाजूला दादर, माटुंगा, माहीम, कुर्ला भाग, आणखी मग शिवचा किल्ला, शिवडी, माझगावचा भाग. पुन्हा हा सारा भाग समुद्रालगतचा. माहीमनंतर खाडी. ती पार कुर्ल्यापर्यंत. त्या खाडीपलीकडे वांद्रे, खार, सांताक्रूझ, पार्ले, लांब दूरवर.

डॉ. अनंत देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या आधीपासून फोर्ट कुलाबा भाग किल्ल्याचा होता. त्या भागात ब्रिटिश अधिकारी, सैन्य राहत असे. कॉटनग्रीनपासून फोर्टपर्यंतच्या भागाला बॉम्बेग्रीन म्हटले जाई. बहुधा, १८५७ नंतर मुंबई-मद्रास-कोलकाता-दिल्ली असा आगगाडीमार्ग सुरू झाला. देशभरातला कापूस गोळा होऊन विलायतेला पाठवण्याचे धोरण निश्चित झाले. त्यामुळे मुंबई बंदरात आलेल्या जहाजांवरून तो तिकडे जात असे. यासाठी ठिकठिकाणांहून आलेल्या कापसाच्या गाड्यांचे ढीग बॉम्बेग्रीन भागात रचून ठेवण्यात येत.

१८४० नंतर इंजीन बसवलेली जहाजे मुंबई बंदरात लागू लागली. विलायतेचा प्रवास सुखकर झाला. ही जहाजे बरोबर लागावीत म्हणून धक्के बांधले गेले. प्रत्यक्ष जहाजबांधणीचे आणि दुरुस्तीचे काम वाडिया बिल्डर्सने सुरू केले. बोट थेट लागण्याची जेटी बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट भाऊ रसुलला मिळाले. त्याने ते पूर्ण केले. जनतेने त्या जेटीला भाऊ रसेलचे नाव दिले. भाऊचा धक्का म्हणू लागले.

किल्ल्यात ब्रिटिश सैनिक मनोरंजनार्थ नाटकं करीत. त्यांच्यासाठी तिथे थिएटर बांधण्यात आले. बॉम्बे अ‍ॅमॅच्युअर थिएटर या नावाने ते प्रसिद्ध होते. मुंबई-ठाणे रेल्वे सुरू झाली, तो मार्ग प्रथम भायखळ्यापर्यंत होता. पुढे तो वाढवून थेट कुलाब्यापर्यंत गेला. भायखळ्यालाच अलेक्झांड्रिया गर्ल्स स्कूल होते. डॉ. आत्मारंग पांडुरंग तर्खडकर यांच्या दुर्गा, माणक आणि अन्नपूर्णा या मुली त्या शाळेत जात असत. १७-१८ व्या शतकात या शहराचा विकास झपाट्याने झाला. त्याआधी इथले स्थानिक लोक म्हणजे कोळी, पाठारे प्रभू आणि भंडारी होत. शीव, माजगाव, कुलाबा, माहीम ही कोळीबांधवांची राहण्याची ठिकाणे होती, मासेमारी हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते.

गिरगावचा विकास लक्षात घ्यायचा तर पूर्वी इथे वाड्या असायच्या. खेतवाडी, खोताचीवाडी, झावबावाडी. आज मेट्रो थिएटरपासून प्रार्थनासमाजपर्यंत गेलेल्या सरळ रस्त्यालगत जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी यांचे बंगले होते. सोनापूरहून जरा पुढे आले की, गवताच्या रानाने जमीन व्यापलेली असे. काही जनावरेही तिथे चरण्यासाठी आणली जात. ब्रिटिशकाळात हा भाग चर्नी रोड म्हणून प्रसिद्ध झाला. शहराचा विकास होऊ लागला आणि आपले नशीब आजमावण्याकरिता, पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून माणसं इथे येऊ लागली. घरं अपुरी पडू लागली आणि चाळी बांधण्यात येऊ लागल्या. एका चाळीला तीनचार मजले असत आणि तिच्यात १५०-२०० कुटुंबं सहज राहू लागली. चाळ भिन्नभिन्न संस्कृतींचे प्रतीक बनली.

१८०० नंतर घरं, रस्ते, रेल्वे, गोद्या, इमारती, कारखाने, शाळा, कॉलेज बांधण्यासाठी माणसे लागू लागली. सुतार, गोवंडी, लोहार अशी नानाविध कलाकौशल्यांमध्ये पारंगत असलेल्या माणसांची गरज भासू लागली. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, खाजगी आॅफिसेस यांच्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांपासून अधिकाºयांपर्यंत माणसं लागत. त्यातच, १८६५ नंतर मुंबईत कापडाच्या गिरण्या उभ्या राहिल्या. तिथेही माणसं हवीच होती.

गिरगावच्या एका बाजूला हँगिंग गार्डनचा डोंगराळ भाग. त्याच्यामागे खाली खोलवर समुद्र. अव्वल इंग्रजांच्या काळात इथे सरकारी अधिकारी राहत, ते ब्रिटिश. संरक्षणासाठी आजूबाजूच्या गुप्त जागी ते तोफा, दारूगोळा ठेवत. अलीकडे त्याचा शोध लागून हा प्रकार लोकांपुढे आला. हँगिंग गार्डनपासून कुलाब्यापर्यंत सुंदर अर्धवर्तुळाकार समुद्रकिनारा आहे. यालाच राणीचा हार (क्वीन नेकलेस) म्हणतात.

अव्वल इंग्रजीचा काळ १८१८ नंतर सुरू झाला आणि आपल्याकडे सुधारणेचा ओघही. तरीही, तत्पूर्वीच मराठी, गुजराती, मुसलमान, पारशी समाजांतील माणसांनी मुंबई गजबजू लागली होती. गोद्यांमधून, नव्याने सुरू झालेल्या सरकारी कार्यालयांमधून, शाळांमधून विविध पेशांच्या माणसांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. १८३५ च्या सुमारास मेकॉलेचे शिक्षणविषयक धोरण अमलात येऊ लागले आणि व्हाइट कॉलरचे बाबूलोक तयार होऊ लागले. त्यामुळे मिशनºयांच्या, पंतोजींच्या शाळांबरोबर आता नव्या शाळाही सुरू झालेल्या. मराठीत पाठ्यपुस्तके नाहीत, शब्दकोश नाहीत, ज्ञानदायक, करमणूकप्रधान पुस्तके नाहीत, असे समजून ती लिहवून घेण्यात येऊ लागली. त्याकरिता पुणे, वाई, कोकणातून शास्त्रीमंडळी येऊ लागली. ती प्राय: गिरगावात वस्ती करीत. याशिवाय, गिरगावातील वेगवेगळ्या देवळांमधून कीर्तनं, प्रवचनं यांच्याबरोबरीने चातुर्मासात ग्रंथ लावण्यासाठी भिक्षुकांना काम मिळे. उदरनिर्वाहाचे ते एक साधन असल्याने तेही इथे स्थिरावले. कोकणातून आणि देशावरून शिक्षणासाठी मुलं येत. गिरगाव त्याने गजबजून जात असे.

१८४५ नंतर गिरगावमधील काही नवशिक्षित तरुणांनी सपत्नीक चौपाटीवर जाण्याची टूम सुरू केली होती. हा नवा अजब प्रकार होता. तेव्हाच्या वृत्तपत्रांत त्याची बातमी आल्याचे दिसते. १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा शिकण्यासाठी कोल्हापूरहून महादेव गोविंद रानडे आणि कोकणातून रामचंद्र गोपाळ भांडारकर हे तरुण आले. अलेक्झांडर ग्रॅण्ट तेव्हा विद्यापीठात होते. ते हँगिंग गार्डन परिसरात राहत. संध्याकाळी घरी परतताना त्यांच्याबरोबर रानडे-भांडारकर असत. त्यादरम्यान त्यांच्या ज्या गप्पा होत, त्यातून दोघा विद्यार्थ्यांचे अनौपचारिक शिक्षण होत असे.

मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्ट यांच्या इमारती बांधण्यासाठी सरकारने प्लॉट दिले. त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम सुरू करण्यात आले. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या नावाने कॉलेज काढण्यात आले. १८३५ मध्ये महाविद्यालयाची औपचारिक स्थापना झाली. काही काळाने एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्वत:ची इमारत झाली. त्यानंतर, कधीतरी ते कॉलेज त्याच्या आताच्या ठिकाणी स्थलांतरित झाले. राजाबाई टॉवरची १ मार्च १८६९ रोजी पायाभरणी केली गेली आणि नोव्हेंबर १८७८ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले.

dranantdeshmukh@gmail.com 

टॅग्स :मुंबई