निवडणुकीत सगे-सोयऱ्यांची भाऊगर्दी; सर्वपक्षीय नातलगांचा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:10 AM2024-04-07T07:10:09+5:302024-04-07T07:11:00+5:30
उमेदवारी देण्यात भाजप अव्वल I शिंदेसेना आणि काँग्रेस पक्ष आहे दुसऱ्या क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घराणेशाही तसेच सगे-सोयऱ्यांच्या राजकारणाचा अंत झाला पाहिजे, असा आग्रह धरत असले तरी भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या नावांवर नजर टाकली तर घराणेशाही चालविण्याशिवाय भाजपलाही पर्याय नाही, असे लक्षात येते. काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे घराणेशाही आहे. मात्र, घराण्यांच्या राजकारणात पुढे आलेल्यांना उमेदवारी देण्यात राज्यात भाजप क्रमांक एकवर, भाजपचा मित्र पक्ष असलेली शिंदेसेना व काँग्रेस क्रमांक दोनवर आहेत. अर्थात बहुतेक उमेदवार असे आहेत की, ज्यांनी निवडणुकीच्या रिंगणात यापूर्वी स्वत:ला सिद्ध केले आहे. तरिही घराण्याची पुण्याई, वाडवडिलांचा लोकसंग्रह याचा फायदा होतोच.
भारतीय जनता पक्ष
पंकजा मुंडे - (बीड) - दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या. या आधी आमदार, मंत्री राहिल्या. लोकसभेसाठी पहिल्यांदाच भाग्य आजमावत आहेत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन पंकजा यांचे मामा.
डॉ. भारती पवार - (दिंडोरी) - दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा. विद्यमान खासदार व दुसऱ्यांदा रिंगणात.
डॉ. हीना गावित -(नंदुरबार) - राज्याचे आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या कन्या. विद्यमान खासदार असून तिसऱ्यांदा मैदानात.
नवनीत राणा - (अमरावती)- आ. रवी राणा यांच्या पत्नी, विद्यमान खासदार, पुन्हा एकदा मागताहेत जनतेचा कौल.
पीयूष गोयल - (उत्तर मुंबई) - मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
आई चंद्रकांता गोयल तीनवेळा आमदार राहिल्या, वडील वेदप्रकाश
गोयल हे वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. दीर्घकाळ भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राहिले.
रक्षा खडसे - (रावेर)- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा. विद्यमान खासदार आणि पुन्हा मैदानात.
अनुप धोत्रे - (अकोला)- माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र.
डॉ. सुजय विखे पाटील - (अहमदनगर). महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र. विद्यमान खासदार, पुन्हा मागताहेत कौल. आजोबा बाळासाहेब विखे पाटील दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री होते.
स्मिता वाघ - (जळगाव) पती दिवंगत उदय वाघ भाजपचे जिल्हाध्यक्ष
होते स्वतः स्मिता या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून समोर आल्या.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
nसातारामधून उदयनराजे भोसले यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर घराणेशाहीशी संबंधित भाजपचे ते दहावे उमेदवार असतील.
अजित पवार गट
अर्चना पाटील - (उस्मानाबाद) - उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा.
सुनेत्रा पवार - बारामती (अजित पवार गट) - पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी.
शरद पवार गट
सुप्रिया सुळे - बारामती- दोन वेळच्या खासदार, आता पुन्हा रिंगणात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या.
वंचित बहुजन आघाडी
ॲड. प्रकाश आंबेडकर - अकोला (वंचित बहुजन आघाडी) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. सध्याच्या चर्चित नेत्यांपैकी एक.
काँग्रेस
छत्रपती श्रीमंत शाहू महाराज - (कोल्हापूर) कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार.
प्रणिती शिंदे - (सोलापूर)- माजी केंद्रीय
मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या. दुसऱ्यांदा आमदार. यावेळी पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत.
डॉ. प्रशांत पडोळे - (भंडारा-गोंदिया)- माजी आमदार दिवंगत यादवराव पडोळे यांचे पुत्र. व्यवसायाने डॉक्टर. पहिल्यांदाच लोकसभा लढताहेत.
प्रतिभा धानोरकर - (चंद्रपूर)- विद्यमान आमदार आहेत. माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी.
शिंदेसेना
राजश्री पाटील - (यवतमाळ-वाशिम) - हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी.
धैर्यशील माने - (हातकणंगले) माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र, विद्यमान खासदार, दुसऱ्यांदा लढत आहेत. आजोबाही होते खासदार.
संजय मंडलिक - (कोल्हापूर) - माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र. विद्यमान खासदार, पुन्हा मागताहेत कौल.
डॉ. श्रीकांत शिंदे - (कल्याण)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र. विद्यमान खासदार, तिसऱ्यांदा कौल मागणार.