Join us

पत्नीला शिवी दिली म्हणून भावाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:07 AM

ब्रेड आणण्याच्या वादातून भावाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चेंबूरमध्ये पत्नीला शिवी दिली म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई - ब्रेड आणण्याच्या वादातून भावाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चेंबूरमध्ये पत्नीला शिवी दिली म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्याने स्वत: भावाला रुग्णालयात दाखल केले. तेथे तो शिडीवरून पडल्याचा बनाव रचला. मात्र रुग्णालयाकडून याबाबत समजताच, गोवंडी पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अविनाश अर्जुन दांगट (३०) याला अटक केली आहे.चेंबूर येथील घाटला गाव परिसरात दांगट बंधू हे एकमजली घरात राहतात. वरच्या मजल्यावर धाकटा भाऊ अविनाश हा पत्नी आणि मुलांसोबत राहतो. तर खालच्या खोलीत मोठा भाऊ रवी (३६) हे पत्नीसोबत राहायचे. गेल्या काही दिवसांपासून रवी यांनी दारूच्या नशेत किरकोळ वादातून अविनाशच्या पत्नीला शिवीगाळ केली. ६ जुलै रोजी देखील असाच प्रकार घडला. पत्नीकडून ही बाब अविनाशला समजली. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर अविनाशने भावाला वरच्या खोलीत बोलावून जाब विचारला. घरामध्ये कोणीच नव्हते. दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात अविनाशने दारूच्या नशेत स्वयंपाक घरातील चाकूने रवीची हत्या केली. भानावर आल्यानंतर त्याने घरातील रक्ताचे डाग पुसून काढले आणि भाऊ दारूच्या नशेत शिडीवरून पडल्याचा बनाव करत त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. त्याच्या अंगावरील जखमा बघून डॉक्टरांना संशय आला. त्यांनी याबाबत गोवंडी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी सुरुवातीला रवीच्या पत्नीकडे चौकशी केली तेव्हा तिने अविनाशवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी अविनाशला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि हत्येच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी रवी यांंच्या पत्नीच्या तक्रारीवरून अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :खूनगुन्हा