दोनशे रुपये चोरल्याच्या संशयातून भावाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 02:52 AM2020-01-24T02:52:48+5:302020-01-24T02:53:02+5:30
दोनशे रुपये चोरल्याच्या संशयातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटना बुधवारी वांद्रे येथे घडली. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी मूर्ती शेट्टीला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबई : दोनशे रुपये चोरल्याच्या संशयातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटना बुधवारी वांद्रे येथे घडली. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी मूर्ती शेट्टीला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
वांद्रे टर्मिनसच्या चमडावाडी नाल्याच्या कट्ट्यावर मूर्ती, त्याचा भाऊ रमेश शेट्टी (२५), पेरिया स्वामी (२६) तसेच अन्य काही बिगारी लोक दारू पिण्यास बसले होते. नशेत असताना मूर्तीचे दोनशे रुपये हरविले. त्याने सर्वत्र शोधाशोध केली. भावाला आणि अन्य सहकाऱ्यांनादेखील विचारणा केली. मात्र सर्वांनी त्याचे पैसे घेतले नसल्याचे त्याला सांगितले. मात्र त्याला रमेशवर संशय आला. तो रमेशला वारंवार पैशांबाबत विचारू लागला आणि त्यातूनच त्यांच्यात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात मूर्तीने रमेशला मारहाण केली आणि त्याचे पाय पकडून त्याला जवळच्या नाल्यात फेकले.
नशेत असल्याने रमेशला नाल्यातून बाहेर पडणे अशक्य झाले. तो मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून अन्य सहकारी तसेच स्थानिक नाल्यात उतरले. त्याला बाहेर काढून व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
मूर्तीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती निर्मलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच तपास अधिकारी फिरोज पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.