भाई, एक मीटर कपडा दाे, ड्रग्ज तस्करीसाठी नवे कोडवर्ड; पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:34 AM2020-12-31T00:34:33+5:302020-12-31T06:58:01+5:30
‘म्याव म्याव’ खरेदी-विक्रीसाठी लढवली शक्कल : पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घातली असतानाही ड्रग्ज तस्कर नवनवे कोडवर्ड वापरून ड्रग्ज तस्करीसाठी धडपड करीत आहेत. यातच म्याव म्याव म्हणून ओळख असलेल्या एमडीची सध्या कपड्यांच्या नावाने खरेदी-विक्री सुरू आहे. यात, ‘भाई, एक मीटर कपडा दाे.’ म्हणजे ‘एक किलो एमडी दे’ असा कोडवर्ड वापरण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारे नवनवे कोडवर्ड वापरणाऱ्या ड्रग्ज तस्कर आणि विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली असल्याचे गुन्हे विभागाचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
अमली पदार्थाच्या विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सॲप आणि इव्हेंट ऑर्गनायझर कंपन्यांच्या साईटसह अन्य सोशल नेटवर्किंग साईट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्या ऑनलाइन बुकिंग साईटवर गुन्हे शाखेच्या सायबर सेलचा वॉच आहे.
शहरातील कुलाबा, गिरगाव, मरिन लाइन्स, वरळी, दादर, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. यात रात्री ११ नंतर पार्टीवर बंदी असली तरी छुप्या पद्धतीने त्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार पोलिसांनी तस्करांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
असे आहेत काही नवे कोडवर्ड
एक मीटर कपडा दो म्हणजे एक किलो एमडी, एक पॉट म्हणजे एक किलो गांजा, आईज म्हणजे एम्फेटामाइन, चरससाठी क्रीम, हेरॉईनसाठी जादू की पुडिया, स्मॅक म्हणजे हेरॉईन, एक चिबा म्हणजे एक किलो चरस असे वेगवेगळे कोडवर्ड गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहेत.