मुंबई - कोरोना महामारीत अन् लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडलंय. गरिबांपासून ते अगदी भिकारी असलेल्या व्यक्तींनीही आपलं दातृत्व दाखवून दिलंय. कुणी भुकेल्यांची भूक भागवलीय तर, अनेकांनी आपल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री सहायता निधीत पैसे जमा केले आहेत. अनेकांनी अन्नछत्र सुरु करुन माणूसकी जपलीय. तर काहींनी आपल्या घासातील घास दुसऱ्याला भरवून मानवतेचा धर्म निभावलाय. श्रमिक अन् मजूरांच्या मदतीच्या कित्येक कथा लॉकडाऊन काळात आदर्श बनल्या आहेत. सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला एक फोटोही असाच आदर्शव्रत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन एका भाजीविक्रेत्याचा फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनाही या भाजीविक्रेत्याच्या जिगरबाज वृत्तीच कौतुक वाटतंय. कारण, या भाजीविक्रेत्याने त्याच्या गाडीवर लिहिलेला दोन ओळींचा संदेश माणूसकीचं दर्शन घडवणारा आहे. गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विविध कॅप्शन देऊन हा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा नेमका कुठला फोटो आहे, तो भाजीवाला कुठं राहतो, याबद्दल काहीही माहिती नाही.