Join us

मुलुंडमध्ये शाळेच्या दाखल्यावर भैया

By admin | Published: June 28, 2015 12:56 AM

शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात भैया असा उल्लेख करण्याचा प्रताप मुलुंडमधील एका शाळेने केला. विद्यार्थ्याने ही चूक शाळेच्या लक्षात

मुंबई : शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात भैया असा उल्लेख करण्याचा प्रताप मुलुंडमधील एका शाळेने केला. विद्यार्थ्याने ही चूक शाळेच्या लक्षात आणल्यानंतर शाळा प्रशासनाने यात तातडीने बदल केला.मुलुंड पश्चिमेकडील नवभारत नूतन विद्यालयाने ही चूक केली. या शाळेतून अनुराग शरणकुमार सिंग हा यंदाच दहावी उत्तीर्ण झाला. महाविद्यालय प्रवेशासाठी त्याने शाळेकडे शाळा सोडल्याचा दाखला मागितला. त्याने रीतसर अर्ज केल्यानंतर शाळेने २३ जूनला अनुरागला शाळा सोडल्याचा दाखला दिला. मात्र जातीच्या रकान्यात भैया असे नमूद केले होते. सुरुवातीला अनुरागचे याकडे लक्ष गेले नाही. महाविद्यालय प्रवेशासाठी तो दहावीचा निकाल व इतर कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडे गेला होता. तेथे त्याच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्याने शाळेकडे याची तक्रार केली. याची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांनी लिपिकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याची कबुली दिली. तसेच अनुरागला सुधारित शाळा सोडल्याचा दाखलाही देण्यात आला. शाळा प्रशासनाने अशी चूक करू नये, असे अनुरागने लोकमतशी बोलताना सांगितले.