मुंबई : वाहन विक्रीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या बंधूंचा पर्दाफाश करण्यास सायन पोलिसांना यश आले. रणजित प्रकाश बोराडे (२३), किरण प्रकाश बोराडे (३२) अशी ठग बंधूंची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.दहावी नापास असलेले हे बंधू धारावीत राहतात. नोकरी नाही. अशात बेरोजगारीत स्वत:चा उदरर्निवाह करण्यासाठी त्यांनी ठगीचा धंदा सुरू केला. सायन तलाव येथे महालक्ष्मी मोटर्स नावाचे दुकानही थाटले. अशा वेळी बस, लोकल तसेच व्यायामशाळेत ते आपले सावज शोधत असे. त्यांना सेकंड हॅण्ड गाडी जास्त भावात विक्री करून देण्याचे आमिष दाखवत. सावज जाळ्यात ओढले की त्यांच्याकडील कागदपत्रांच्या खऱ्या प्रतींबरोबरच वाहन घेऊन जात आणि ही वाहने ते परस्पर विकत होते. सायन परिसरात राहणारे बबन निकम यांची जीममध्ये या बंधूंसोबत ओळख झाली. ते आपल्याकडील हुंडाई कार विकत असल्याची माहिती या दुकलीला मिळाली. त्यानुसार त्यांनी ७५ हजारांत ही कार विकून देऊ असे आमिष त्यांना दाखविले. त्यांनीही होकार देत आपल्याकडील कागदपत्रे आणि गाडी या दुकलीच्या ताब्यात दिली. मात्र त्यानंतर या बंधूंनी ८० हजार रुपयांमध्ये ही कार परस्पर विकली. आणि निकम यांना ग्राहक मिळत नसल्याचे कारण पुढे करत टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निकम यांनी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी या बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला. तपासात त्यांच्यासह आणखीन ६ ते ७ जण तक्रार घेऊन आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक येशूदास गोरडे यांच्या तपास पथकाने शोध सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक गोविंद कदम, अंमलदार राजेश सावंत, पंकज सोनावणे, धनराज पाटील, महेश पाटील यांचा तपास पथकात समावेश होता. दोघांनाही गुप्त माहिरीदारांच्या मार्फत सायन परिसरातून अटक करण्यात आली. त्या दोघांकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच अन्य दोन वाहनांच्या खऱ्या प्रतीही हस्तगत करून तपास पथक अधिक तपास करत आहे. (प्रतिनिधी)आपलेही वाहन गायब आहे का?या बंधूंनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बंधूंच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांनी सायन पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहन विक्रीच्या नावाखाली गंडा घालणारे बंधू गजाआड
By admin | Published: September 03, 2016 2:12 AM