मलबार हिल पोलिसांची कारवाई, पुण्यातून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्रामवरून लोणावळ्यातील अस्तित्वात नसलेल्या बंगल्याच्या नावाने जाहिरात फोटो शेअर करून पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील दोन ठग भावंडांना मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश रूपकुमार जाधवानी उर्फ करण उर्फ सिद्धेश (२६) आणि आकाश रूपकुमार जाधवानी (२२) अशी अटक करण्यात आलेल्या भावंडांची नावे असून अधिक तपास सुरू आहे.
मलबार हिल परिसरात २८ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २४ जून ते २७ जून दरम्यान लोणावळा भागात सहलीला जाण्यासाठी बंगल्याचा शोध सुरू केला. अशात, इन्स्टाग्रामवर बंगल्याची जाहिरात पाहिली. संबंधित कॉलधारकाने बंगल्याचे फोटो पाठविले. तसेच कमी किमतीत बंगला मिळत असल्याने त्यांनी ३ दिवसांसाठी ७२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरवला. ठरल्याप्रमाणे आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपये पाठवले. पुढे पैसे भरूनदेखील बंगल्याबाबत काहीही माहिती मिळत नसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लोणावळ्यातील नातेवाइकाला संबंधित ठिकाणी जाऊन बंगल्याची पाहणी करण्यास सांगताच, तेथे बंगला अस्तित्वात नसल्याचे समजल्याने धक्का बसला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
यातच मलबार हिल पोलिसांनी त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून तपास सुरू केला. तांत्रिक तपासावरून २९ जून रोजी पुण्यातून अविनाश रूपकुमार जाधवानी उर्फ करण उर्फ सिद्धेश (२६) आणि आकाश रूपकुमार जाधवानी (२२) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानुसार ३० जून रोजी दोघांना अटक करण्यात आली. यात अविनाश हा पुणे येथील कल्याणीनगरच्या मित्तल क्रिस्ट इमारतीत तर आकाश हा वडगाव शेरी येथे राहण्यास आहे. ही मंडळी अशाच प्रकारे अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची जाहिरात देत फसवणूक करत होते. त्यांच्या विरोधात मलबार हिल, डी.बी. मार्ग, दादर, मुलुंड, ठाणे पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे नोंद आहेत.