भाऊ - दादांच्या प्रचारात गँगस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:52 AM2019-10-13T00:52:08+5:302019-10-13T00:52:45+5:30
राजकीय नेत्यांना गुन्हेगार हवेसे । कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी
मुंबई : विक्रोळी मतदारसंघात भाऊसोबत गँगस्टर मयूर शिंदे फिरत असल्याने येथील प्रतिस्पर्धी उमेदवार दादाने ठाण्यातील बंटीच्या राजाश्रयाला असलेल्या भांडुपमधील एका गँगस्टरला आपल्यासोबत घेत कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्याची तयारी केली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून राजकीय वरदहस्ताखाली भांडुपमध्ये गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत. भाई बनून फिरण्याचा मान येथील प्रत्येकालाच हवा असतो. यातूनच उदयास आलेल्या अनेक गुन्हेगारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत पुढची प्रत्येक पिढी गुन्हेगारीमध्ये उतरत गेली आहे. नेमका हाच धागा पकडून पक्षीय राजकारणी, झोपडपट्टी गुंड या नवख्या पोरांना आपल्या वरदहस्ताखाली घेऊन गुन्हेगारीला खतपाणी घालतात. वाढदिवसाच्या झळकणाऱ्या बॅनर्सवर राजकारण्यांच्या फोटोसोबत हे गुन्हेगार भाईसुद्धा तेवढ्याच मानाने झळकताना नेहमी दिसतात.
हे गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यात अडकल्यास हेच राजकारणी काळवेळ न बघता त्यांच्या मदतीला धावतात. त्यामुळेच राजकीय प्रचारावेळी हे राजकारणी आता या गुन्हेगारांचा उपयोग करून घेत आहेत.
काँग्रेसच्या माजी आमदारासोबत असलेल्या प्रतिस्पर्धी गँगस्टर संतोष चव्हाण उर्फ काण्या संत्या आणि अनिल पांडे यांचे पूर्वनियोजित कटातून काटे काढल्यानंतर अमित भोगले व मयूर शिंदे या दोघांचे येथील परिसरावर वर्चस्व आहे. या दोघांवरही बड्या राजकीय व्यक्ती, आमदार आणि मंत्र्यांचे वरदहस्त आहेत. त्यामुळे या दोघांपासून वेगळ्या होऊन स्वतंत्र टोळ्या तयार केलेल्या गुन्हेगारांना गुन्हेगारी जगतात पाय रोवण्यास येथील राजयकीय प्रतिनिधींनी जवळ केले आहे.
त्यातच, भाऊच्या प्रचारात शिंदे फिरताना दिसला. शिंदेने मागच्या वेळेस दादांच्या कार्यकर्त्यावर हात उगारला होता. यातूनच सावधगिरी म्हणून दादाने अन्य भाईला हाताशी घेतले आहे. त्यामुळे दोघांमधील जंगी लढत सध्या विधानसभेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
राऊतांच्या प्रचारातून भाजप पदाधिकारी गायब...
च्विक्रोळी विधानसभामधील भाजपचे प्रमुख पदाधिकारी सेना उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवताना दिसत आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते हे भांडुप, मुलुंडच्या उमेदवारासोबत फिरताना दिसतात. मात्र, विक्रोळीत फिरणे टाळत आहेत.
च्त्यात, सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही अंतर्गत धुसफुस सुरू आहे. तर, दुसरीकडे मनसेचे उमेदवार विनोद शिंदे आणि वंचितचे उमेदवार सिद्धार्थ मोकळे यांनी मात्र, या भाईगिरीकडे दुर्लक्ष करत दारोदारी प्रचारावर भर दिल्याचे पाहावयास मिळत आहे. या नाराजीचा कुणाला, किती आणि कसा फायदा होईल हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.