Join us  

भावाच्या मारेकऱ्याची हत्या

By admin | Published: June 30, 2017 3:10 AM

भावाच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याला ठार मारण्याचा प्रकार मालाडच्या मालवणीत घडला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी दोन भावांना गुरुवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भावाच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याला ठार मारण्याचा प्रकार मालाडच्या मालवणीत घडला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी दोन भावांना गुरुवारी अटक केली.गुलाम मूर्तझा अमीर अहमद (२०) आणि उमर वालीद सलमानी (२९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अहमद हा बिगारी काम करतो तर त्याचा चुलत भाऊ सलमानी हा त्याच्या वडिलांच्या कपड्याच्या दुकानात त्यांना मदत करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणीच्या गेट क्रमांक सहामध्ये असलेल्या कलेक्टर कंपाउंडमध्ये बुधवारी रात्री हा प्रकार घडला. सय्यद असलम शेख असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याने काही वर्षांपूर्वी अहमदच्या भावाची हत्या केली होती. या प्रकरणी तो अनेक वर्षे कारागृहात होता. दीड वर्षापूर्वी तो जामिनावर बाहेर आला. मात्र अहमदला भीती वाटत होती की, आपल्या भावाप्रमाणेच आपल्या जिवालादेखील सय्यदमुळे धोका आहे. तसेच भावाची हत्या केल्याचा रागदेखील त्यांच्या मनात होता. त्यामुळे सय्यदचा काटा काढायचे त्याने ठरविले. त्यासाठी त्याने सलमानीची मदत घेत शेखला मालवणीत अडविले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याला जखमी केले आणि दोघे पसार झाले. पोलीस नियंत्रण कक्षावर याबाबत स्थानिकांनी या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेखला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करविले. तेथे डॉक्टरने त्याला तपासून मृत घोषित केले. शेखच्या हत्येप्रकरणी अहमद आणि सलमानी यांना अटक केल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले.