भाऊचा धक्का, ससून बंदराच्या पुनर्विकासासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:40 AM2018-01-21T01:40:52+5:302018-01-21T01:41:19+5:30
ससून गोदी बंदर आणि भाऊचा धक्का यांचा पुनर्विकास व आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी एका समन्वय समितीची स्थापना केली असून, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील.
मुंबई : ससून गोदी बंदर आणि भाऊचा धक्का यांचा पुनर्विकास व आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी एका समन्वय समितीची स्थापना केली असून, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील.
ससून गोदीचा पुनर्विकास सागरमाला प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहेत, तसेच राज्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी बंदराच्या आधुनिकीकरण करण्यासाठी ५२ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणी सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी राज्याच्या मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.
सूतगिरण्यांना मान्यतेचे शासनाचे नवे धोरण जाहीर
सहकारी सूतगिरण्या सुरू करण्यासाठीचे नवे धोरण राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने शनिवारी जाहीर केले. त्यानुसार, एखादी सूतगिरणी अवसायनात गेलेली असेल, तर त्याच तालुक्यात दुसरी सूतगिरणी सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
सहकारी सूतगिरण्यांना नोंदणीसाठी २५ लाख रुपये सभासद भांडवलापोटी जमा
करावे लागतील. ही २५ लाख रुपयांची रक्कम सहकारी सूतगिणीला बँक खात्यातून काढता येणार नाही.
सहकारी सूतगिरणीची नोंदणी २५ लाख रुपये एवढ्या सभासद भागभांडवलावर झाली, तरीही सूतगिरणी सभासद भागभांडवल १ कोटी २३ लाख रुपये इतकी रक्कम जमा करणार नाही, तोवर सहकारी सूतगिरणीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थसहाय्यासाठी विचारात घेण्यात येणार नाही.