Join us

विलेपार्ल्यात जमावबंदीचं कलम लागू! घोषणाबाजी करणा-या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 10:55 AM

परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी उचललं आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला.जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई - परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी उचललं आहे. विलेपार्ल्यात जमावबंदीच कलम 144 लागू करण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर जमाव पांगला. सध्या छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. 

दोन महिन्यांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. काल पर्यंत पोलिसांनी कोणतीही ताकिद दिली नाही. कार्यक्रमाच्या पाच मिनिटांआधी कार्यक्रम रद्द करण्यास पोलिसांनी सांगितले. ते शक्य नसल्याने कार्यक्रमावर ठाम होतो. मात्र सरकारने आवाज दाबण्यासाठी पोलिसांना पुढे करून ही दडपशाही केली असे छात्रभारतीने म्हटले आहे. कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना अटक केली असून पोलिसाकडून १४९ ची नोटीस देण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांची भाषणे होणार होती. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या  राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद सहभागी होणार होते. 

टॅग्स :जिग्नेश मेवानी