बीएससी सेमिस्टर ६ चा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:54 AM2018-07-04T00:54:12+5:302018-07-04T00:55:09+5:30
मुंबई विद्यापीठाने एप्रिल-मे २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ चा निकाल मंगळवारी जाहीर केला. या परीक्षेत एकूण १७,५०८ विद्यार्थी बसले होते. यात ९,११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ५२.७९ टक्के लागला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल-मे २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ चा निकाल मंगळवारी जाहीर केला. या परीक्षेत एकूण १७,५०८ विद्यार्थी बसले होते. यात ९,११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ५२.७९ टक्के लागला आहे. पारंपरिक परीक्षांपैकी पदवीचा हा पहिला निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे.
तृतीय वर्ष बीएस्सी सत्र-६ या परीक्षेला १७,९०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १७,५०८ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४२० विद्यार्थ्यांना ओ हा ग्रेड मिळाला असून ३,४६३ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळवला आहे, तर ग्रेड बी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३,०९० एवढी
आहे.
यापूर्वी विद्यापीठाने बीएसस्सी आयटी, बीएमएस, बी.फार्मसीसह अनेक महत्त्वाचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत, यामुळे परदेशात व देशात उच्च शिक्षण घेणाºया अनेक विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश निश्चितीसाठी याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत विद्यापीठाने ९० निकाल जाहीर केले आहेत. तरीही बरेच निकाल रखडले असल्याने सर्व निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
तृतीय वर्ष बीएससी सत्र ५ चा निकालही जाहीर
विद्यापीठाने १ जुलै २०१८ रोजी तृतीय वर्ष बीएससी सत्र-५ चा निकाल जाहीर केला. या परीक्षेस ७२६० विद्यार्थी बसले होते. यातील ३३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. सत्र-५ ची परीक्षा मे महिन्यात झाली होती. तृतीय वर्ष बीएससी सत्र-५ व ६ या दोन्हीही परीक्षांचे मूल्यांकन विद्यापीठाने महाविद्यालयाच्या साहाय्याने लवकर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मूल्यांकनाकडे प्रत्यक्ष लक्ष दिले. ते वेळोवेळी परीक्षा विभागात प्रत्यक्ष येऊन मूल्यांकनाचा आढावा घेत होते. बीएससीबरोबरच तृतीय वर्ष बीए सत्र-६ चे मूल्यांकन ९८ टक्के पूर्ण झाले असून बी.कॉम सत्र-६ चे मूल्यांकनही ९६ टक्के पूर्ण झाले आहे.
निकाल लवकर लावणे ही प्राथमिकता
पदवीस्तरावरील अनेक निकाल लागलेले आहेत. शिल्लक राहिलेले निकाल लवकर लावणे ही विद्यापीठाची प्राथमिकता असून बी.ए. व बी.कॉमचे निकालही येत्या काही दिवसांत लावले जातील.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ