बीएसएनएल कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:26 PM2020-07-07T13:26:19+5:302020-07-07T13:26:49+5:30
विद्यमान कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी पसरली आहे.
मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चा तोटा जास्त होत असल्याने खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवण्यात आल्यानंतरही विद्यमान कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी पसरली आहे.
जुलैचा पहिला आठवडा उलटत आला तरी बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांना अद्याप जून महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने सरकारने आर्थिक संकटामुळे स्वेच्छानिवृत्ती योजना राबवल्यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही पूर्वीप्रमाणे वेतनाची समस्या कायम राहिल्याने कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. बीएसएनएलच्या स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी अद्याप देण्यात आलेली नसल्याने ते कर्मचारी देखील नाराज आहेत. बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन चे गणेश हिंगे यांनी याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगितले.