Join us

कोविड व निसर्ग चक्रीवादळाच्या काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 7:03 PM

कोविड 19 व निसर्ग चक्रीवादळ काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

 

मुंबई : कोविड 19 व निसर्ग चक्रीवादळ काळात चांगली दूरसंचार सेवा देण्यात बीएसएनएल आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळात  रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासहित मुंबई जवळील किनारपट्टी परिसरातील दूरसंचार नेटवर्क तीन दिवस बंद झालेले असताना बीएसएनएलच्या कर्मचारी, अभियंत्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोबाइल नेटवर्क, लँडलाइन नेटवर्क, ब्रॉडबँड सेवा व सँटेलाईट सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न केले व त्यामध्ये यशस्वी झाले. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कठिण काोलात बीएसएनएलने पुरवलेल्या महत्त्वपूर्ण सेवेबाबत बीएसएनएलच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

रायगड जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांसाठी अधिक प्रमाणात बीएसएनएल सेेवेचे कनेक्शन त्यांनी आरक्षित केले. बीएसएनएलचे महाव्यवस्थापक पी. के .सिंह यांनी याबाबत माहिती दिली.  रायगड मधील अलिबाग येथे सरकारी कार्यालयांना बीएसएनएलने पुरवलेल्या सँटेलाईट सेवेच्या माध्यमातून सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट दिल्लीतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणे शक्य झाले होते. बीएसएनएलने स्थानिक प्रशासनाला आणीबाणीच्या काळात संपर्क व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दूरसंचार सेवा पुरवली व मदत, बचाव पथकांशी, प्रशासनाशी संपर्कात राहण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या. इतर खासगी कंपन्यांची दूरसंचार सेवा विस्कळीत व ठप्प झालेली असताना संपर्कात राहण्यासाठी व ंदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला बीएसएनएलतर्फे सीम कार्ड देण्यात आली. 

या संकटाच्या काळात बीएसएनएलचे स्थिर  नेटवर्क उपलब्ध असल्याने इतर खासगी दूरसंचार सेवापुरवठादार  कंपन्यांना बीएसएनएलचे नेटवर्क वापरुन त्यांच्या ग्राहकांना अडचणीच्या काळात सेवा पुरवण्याची परवानगी देण्यात आली होती. बीएसएनएलने नेहमीच अशा आणीबाणीच्या कालावधीत विश्वासार्ह व स्थिर दूरसंचार सेवा पुरवून अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याची कृती केली आहे. सांगली, चैन्नई, केरळ, जम्मू काश्मीर येथील पूर, बंगाल, ओडिसा मधील चक्रीवादळ, उत्तराखंड मधील पूर, अशा देशातील विविध भागातील नैसर्गिक आपत्ती काळात बीएसएनएलने नेहमी ग्राहकांना,  सर्वसामान्य नागरिकांना सेवा पुरवून आपली जबाबदारी पार पाडली अाहे असे सिंह म्हणाले. 

 

टॅग्स :चक्रीवादळकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनिसर्ग चक्रीवादळ