बीएसएनएलच्या कर्मचा-यांचा संप
By admin | Published: April 21, 2015 10:38 PM2015-04-21T22:38:25+5:302015-04-21T22:38:25+5:30
भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) ऊर्जितावस्था आणण्यासाठी विविध मुद्द्यांवर सरकार आणि बीएसएनएलकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही
अलिबाग : भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) ऊर्जितावस्था आणण्यासाठी विविध मुद्द्यांवर सरकार आणि बीएसएनएलकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही. त्यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी मंगळवारी अलिबाग येथील बीएसएनएल कार्यालयाबाहेर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी घोषणा देत बंद पुकारला.
रायगड जिल्ह्यातील ६०० कर्मचारी, १०० अधिकारी असे एकूण ७०० जण सहभागी झाले होेते. त्याचप्रमाणे ठेकेदारीमधील सुमारे १७० कामगार २१, २२ एप्रिल अशा दोन दिवसीय संपात सहभागी झाले होते. जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती अलिबाग येथील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश मेस्त्री यांनी लोकमतला दिली.
बीएसएनएलच्या विस्ताराकरिता आवश्यक असणारी साधनसामग्री तातडीने खरेदी करण्यात यावी, बीएसएनएलची विस्तारीत सेवा देण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्यात यावे, एडीसीच्या बदल्यात बाराशे करोड रुपये द्यावेत, विविध युनियन आणि असोसिएशनच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत बीएसएनएल आणि एमटीएनएलचे एकत्रिकरण करू नये, १.२ एमएचझेड स्पेक्ट्रम परत करण्याची टीआरएआयची शिफारस रद्द करण्यात यावी, बीएसएनएलमधील विविध पदांची भरती करावी, सहा हजार ७०० करोड रुपयांचे स्पेक्ट्रम चार्जेस तातडीने रिफंड करणे, डेलोईट कमिटीच्या बीएसएनएल आणि कामगार विरोधी शिफारशी रद्द करा, या सह अन्य मागण्यांचा समावेश आहे.