Join us

बीएसयूपी घरांच्या वाटपावरून आघाडीत बिघाडी

By admin | Published: September 13, 2014 12:05 AM

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या वाटपाच्या मुद्यावरून वाद उफाळला आहे

ठाणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या वाटपाच्या मुद्यावरून वाद उफाळला आहे. चाव्या वाटपाला न बोलवल्याचा राग मनात धरून काँग्रेसने राष्ट्रवादीला जाब विचारण्याऐवजी महापालिका आयुक्तांना घेराव घालून याचे खापर प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न केला. कोपरीतील सिद्धार्थनगर भागात महापालिकेने बीएसयूपीची घरे उभारली आहेत. यात १४ रहिवासी अपात्र ठरल्याने उर्वरित रहिवाशांना या घरांचा ताबा मिळाला नव्हता. परंतु, आचारसंहिता लागेल आणि पुन्हा दोन महिने ही प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने ७४ रहिवाशांना गुरुवारी चाव्यावाटप केले. या वेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. परंतु, काँग्रेसच्या नगरसेविका मालती पाटील यांना न बोलवल्याने त्या नाराज झाल्या. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने काँग्रेसच्या नगरसेविकेला डावलल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे या कार्यक्रमाला न बोलवल्याचा राग मनात धरून शुक्रवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना घेराव घालून दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, गटनेते विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे, नारायण पवार आदी उपस्थित होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद आहे. परंतु, घरांच्या चाव्यावाटप मुद्यावरून तो चव्हाट्यावर आला़ याचे खापर मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नगरसेविका असताना प्रशासनाने आपल्याला आमंत्रण का दिले नाही, असा सवाल मालती पाटील यांनी केला. परंतु, आयुक्त असीम गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेसच्या गटनेत्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली होती, असे सांगताच काँग्रेसचे इतर पदाधिकारी अवाक झाले. यावर गटनेते विक्रांत चव्हाण यांना याची माहिती होती, परंतु त्यांनी ऐनवेळी सांगितल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, ही जबाबदारी प्रशासनाची होती. त्यांनी आमंत्रण देणे अपेक्षित होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आता उर्वरित १४ पैकी ११ रहिवासी पात्र झाल्याचे सांगून आयुक्तांनी त्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही त्यांना दिल्याने अखेर काँग्रेसने आंदोलन मागे घेतले. परंतु, या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडल्याने याचे पडसाद उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)