मुंबई : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने मुंबईचे डबेवाले मुंबईकरांना अनोख्या पद्धतीने ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहेत. पाणी टंचाईचे भीषण वास्तव लक्षात घेऊन २२ मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधत जलाचे संवर्धन करा असा संदेश मुंबईचा डबेवाला देणार आहेत. यासाठी आधुनिक पध्दतीच्या ‘फ्लॅश मॉब’च्या माध्यमातून हे सादरीकरण करणार आहेत.प्रतिदिन एका छोट्या कुटुंबाला सरासरी ३0 ते ५0 लिटर स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची गरज भासते. एकूण पृथ्वीचा विचार करता जगामध्ये दरवर्षी जवळपास दीड हजार पेक्षा अधिक क्युबिक किलोलीटर्स सांडपाणी तयार होते. त्यामुळे वेळीच सावध होऊन सामान्य मुंबईकरांनी पाण्याबाबत जागृत होऊन स्वच्छ व पिण्यास योग्य अशा पाण्याच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे डबेवाल्यांचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. मुंबईच्या डबेवाल्यांचा हा फ्लॅशमॉब चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर २१ मार्च रोजी सांयकाळी ४ वाजता करणार आहे. ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा फ्लॅशमॉब रंगणार आहे. (प्रतिनिधी)
डबेवाल्यांचा फ्लॅशमॉब
By admin | Published: March 21, 2017 2:23 AM