श्रीकांत जाधव / मुंबई : बुद्धं शरणं गच्छामि या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात गुरुवारी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्ध धर्मीयांकडून विहारांमध्ये खीर वाटण्यात आली.
वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञान प्राप्ती झाली. या दिनाचे औचित्य साधून यंदा सर्वत्र बुद्धपर्व साजरे केले जात आहे. गुरुवारी मुंबई विद्यापीठ पाली विभागाकडून भव्य असे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे वरळी येथील प्राचीन बुद्धविहार तसेच परळ, चेंबूर, गोराई विपश्यना केंद्र येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धविहारांमध्ये सकाळी पंचशील ध्वजारोहण, सामूहिक बुद्धवंदना, धम्म रॅली, विपश्यना अभ्यासवर्ग, सामूहिक प्रवचन करण्यात आले. चैत्यभूमीवरही उपासक-उपासिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले.