रामदास आठवले यांच्यासाठी बुद्धवंदना, प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:33 AM2020-11-04T05:33:58+5:302020-11-04T05:34:22+5:30
Ramdas Athavale : मंगळवारी घाटकोपर येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भिक्खू निवास येथे भिक्खू संघाच्या वतीने बुद्धवंदना, उपोसथ व्रत, मंगलमैत्री, परित्राण पाठचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना सुरू आहेत.
मंगळवारी घाटकोपर येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भिक्खू निवास येथे भिक्खू संघाच्या वतीने बुद्धवंदना, उपोसथ व्रत, मंगलमैत्री, परित्राण पाठचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अभिनेत्री पायल घोषसह रिपाइं कार्यकर्त्यांनी बुद्धवंदना केली. या वेळी पूज्य भदंत संघकीर्ती महाथेरो, भदंत वीरत्न थेरो यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होते. रिपाइंचे प्रसिद्धिप्रमुख हेमंत रणपिसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तर, सोमवारी आठवले यांच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी रिपाइं कार्यकर्ते आणि आठवले यांच्या कुटुंबीयांनी पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना केली. तसेच भिक्खू संघाला चिवरदान केले. याशिवाय, सोलापूर जिल्ह्यातील सर्व बुद्धविहार आणि रिपाइं शाखांमध्ये सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. पुण्यात कोजागरी पौर्णिमेला रिपाइं कार्यकर्त्यांनी उपोसथ व्रत करून बुद्धवंदना घेऊन आठवले यांची तब्येत चांगली व्हावी यासाठी प्रार्थना केली, तर पंढरपूर येथे दर्ग्यावर चादर चढविण्यात आली.