मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाने महाराष्ट्राची निराशा केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. २०२३ पर्यंत दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करणार आणि राजकीय वादात अडकलेली बुलेट ट्रेन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प वगळता मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही हाती लागले नाही.
मुंबई महानगरासाठी लोकल वाहतूक सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वर्षांपासून लोकल सेवा सुसह्य करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा लोकल सेवेसाठी कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. कर्नाटकची राजधानी बंगळुरूत उपनगरीय रेल्वे सेवेसाठी साहाय्याची घोषणा मात्र अर्थमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा अर्थसंकल्पाने महाराष्ट्राची घोर निराशा केल्याचा आरोप केला आहे.देशाचे ग्रोथ इंजीन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय झाला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित अर्थसाहाय्य करण्यात आले नाही.
तसेच दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवाय, देशात पाच ऐतिहासिक स्थळांचा ‘आयकॉनिक साईट’ म्हणून पुनर्विकास करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्रातील कोणत्याही स्थळाचा यासाठी विचार करण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राबाबतचा दुजाभाव आजच्या अर्थसंकल्पाने अधोरेखित केला आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित अर्थसाहाय्य करण्यात आले नाही. रेल्वे सेवा आणि प्रस्तावित रेल्वे लाइनचाही अर्थसंकल्पात उल्लेख केला नाही.