Budget 2020: रेल्वे इंजिनाला खासगीकरणाचे इंधन; १५० गाड्या भागीदारी तत्त्वावर चालविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:02 AM2020-02-02T04:02:49+5:302020-02-02T06:43:42+5:30
७२,२१६ कोटी रुपयांचा निधी
मुंबई : सर्वसामान्य भारतीय प्रवाशांच्या वाहतुकीसाठी किफायतशीर साधन असलेल्या रेल्वेच्या इंजिनाला खासगीकरणाचे इंधन देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सन २०२०-२१ साठी रेल्वे मंत्रालयाला ७२ हजार २१६ कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या वर्षभरात सुरू झालेल्या दोन खासगी एक्स्प्रेसच्या प्रयोगानंतर आता रेल्वे मंत्रालयाने देशभरात तब्बल १५० गाड्या सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील गाडी इंदौर ते वाराणसी एक्स्पे्रस या मार्गावर चालविण्यात येईल.
पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ आणि दुसरी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावत आहे. भविष्यात मुंबई-पुणे, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, पुणे-पाटणा, मुंबई-वाराणसी, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई अशा १०० वेगवेगळ्या मार्गांवर खासगी एक्स्प्रेस चालविण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने या खासगी ट्रेन चालविण्यात येतील.
27000 किमी मार्गाचे विद्युतीकरण
ज्या ठिकाणी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले नाही अशा २७ हजार किमी मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
550 रेल्वे स्थानकांवर वायफाय
देशातल्या सुमारे ६००० रेल्वे स्थानकांवर वायफाय उपलब्ध असून, आता आणखी ५५० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू झाली आहे.
सौरऊर्जेला चालना
सौरऊर्जेला चालना देण्यासाठी रेल्वे रुळांच्या बाजूला सोलार पॉवर ग्रीड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटन विशेष गाड्या
खासगी तेजस एक्स्प्रेसप्रमाणे आणखी काही गाड्या सुरू करण्याचे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे. या गाड्या पर्यटकांसाठी चालविल्या जातील.
किसान रेल योजना
शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘किसान रेल’ या नवीन योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. खासगी तत्त्वावर चालणाºया या रेल्वेद्वारे दूध, मांस, मासे, फळे यांसारख्या नाशवंत पदार्थांची जलद वाहतूक करण्यात येईल. यासाठी विशेष एसी डब्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनचा पाठपुरावा
मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा नाममात्र उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. ही ट्रेन सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करू, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
चार स्थानकांचा पुनर्विकास
नागपूर, साबरमती, अमृतसर, ग्वाल्हेर या चार रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल.
बंगळुरूमध्ये उपनगरी रेल्वे
मुंबईप्रमाणेच बेंगळुरूमध्ये १४८ किमी उपनगरीय ट्रेन सुरू करण्यात येईल. केंद्र यासाठी २०% निधी देईल.