मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर आल्या आहेत. अनेकदा अमृता फडणवीस विविध कारणांमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. कधी गाण्यामुळे तर कधी त्यांच्या राजकीय टोलेबाजीमुळे अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, यातच आता अमृता फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या एका प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पाचं भाजपा नेत्यांनी कौतुक केले तसेच अमृता फडणवीस यांनीही निर्मला सीतारामन यांचे कौतुक करताना मागील १०० वर्षात कधीही पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार मानले, तर कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व देश आपल्याकडून शिकतोय असं अमृता यांनी ट्विटमधून म्हटलं.
अमृता फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना सोशल मीडियात चांगलेच ट्रोल करण्यात आले, स्वातंत्र्याला १५० वर्ष तरी पूर्ण झाली आहेत का? देशाला ७३ वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलतोय अशा शब्दात नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली. तर एका युजरने सांगितले की, स्वतंत्र हिंदुस्तानाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला गेला, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्ष झालीत असं सांगितले.
अर्थसंकल्पात काय झालं स्वस्त? काय महाग?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात दोन गोष्टी सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या ठरतात. यातील पहिली गोष्ट म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सरकारकडून यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण अनेक महत्वाच्या गोष्टींवरचा आयात कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. नेमकं काय स्वस्त होणार? आणि काय महागणार? हे जाणून घेऊयात...
काय होणार स्वस्त?
स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
तांब्याच्या वस्तू
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू
काय महागणार?
मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्यानं मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत.
परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
परदेशातून आयात केले जाणारे कपडे
कॉटनचे कपडे महागणार