मुंबई - मुंबईला स्चच्छ व सुंदर करण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्प तयार केला आहे़ हा संकल्प कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही़ मात्र त्याची स्वप्ने या अर्थसंकल्पात दाखवण्यात आली आहेत़ त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्याचवेळी महापालिकेवर आर्थिक बोजाही वाढला आहे़ असे असले तरी मुंबई स्वच्छ व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा आहे.
मलनि:सारणाची सुविधा ६८ वरून १०० टक्क्यांवर
मुंबईचा समुद्र, नद्या व तलाव स्वच्छ राखणे हे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी मुंबईकरांना पुरविण्यात येत असलेल्या मलनि:सारणाची सुविधा सध्याच्या ६८ टक्क्यांवरून २०३०पर्यंत १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार, मलजल वाहिन्यांची जोडणी सुविधा १०० टक्के साध्य करण्यासाठी मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई मलनि:सारण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी २४४.३६ कोटी तरतूद होती. यामध्ये ३१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही तरतूद आता ३२०.१६ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. सर्व मलजल प्रक्रिया केंद्रांच्या नवीन निविदांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी २० टक्के पाणी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून देणे संबंधित कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रकल्पासाठी ४०२.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रक्रिया केंद्रांसाठी टप्प्याटप्प्याने निविदा मागविण्यात येत आहेत. यात वरळी, धारावी, वर्सोवा, भांडुप, घाटकोपर, वांद्रे आणि मालाड या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मलजल बोगद्यांच्या कामांसाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद आहे.
विद्यमान विकसित व नियोजन विकास रस्त्यांवर ९३.६८ किलोमीटर लांबीच्या मलजल वाहिन्या टाकणे, त्यांचे काम आकारमान वाढविणे इत्यादी कामे नियोजित आहेत. मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा कृती आराखडा हाती घेण्यात आला आहे.मिठी नदीमध्ये जात असलेल्या सांडपाण्याचा प्रवाह वळविण्यासाठी आराखडा चार टप्प्यांमध्ये तयार करण्यात आला आहे. दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नदीच्या किनारी मलनि:सारण वाहिन्या टाकण्याची कामे प्रस्तावित आहेत.
मलजल वाहिन्यांची नियमित साफसफाई करताना मलजलाशी येणार मानवी संपर्क १०० टक्के कमी करण्यासाठी ३ जलद प्रतिसाद वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. मलजल गाळणी, जेटिंगची ७ यंत्रे, २४ छोट्या आकाराची सफाईयंत्रे खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. एकंदर मलनि:सारण प्रचालन खात्यासाठी १४८.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.