मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:51 IST2025-03-04T05:49:02+5:302025-03-04T05:51:16+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा जाहीर होण्याची अटकळ ठरली फोल; शोकप्रस्तावामुळे विरोधी नेत्यांचे घोषणाबाजीवर समाधान

मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादग्रस्त ठरलेले अन्न व नागरी पुरवठा मत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनामा होईल, अशी सुरू असलेली चर्चा फोल ठरल्यानंतर विरोधकांनी आता हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरण्याची रणनीती आखली आहे. पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव असल्याने विरोधकांना या मुद्यावर फारसे आक्रमक होता आले नाही. कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या आवारात विरोधकांनी मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून घोषणाबाजी केली.
अधिवेशनात हा मुद्दा कशा पद्धतीने लावून धरता येईल आणि मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्याासाठी सरकारवर कसा दबाव वाढवायचा याबाबत चर्चा करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, सतेज पाटील यांच्यासह या तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
धनंजय मुंडेंची फडणवीस, बावनकुळेंशी चर्चा
धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी लॉबीत दहा मिनिटे चर्चा केली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही त्यांनी भेट घेतली.
मला बोलता येत नाही... अन् डाेळ्यांवर गाॅगल
मुंडेंना माध्यमांनी गाठले असता ‘मला बोलता येत नाही, बेल पाल्सी आजार झाला आहे’, असे ते अडखळत उत्तरले. मुंडे सभागृहात आणि बाहेरही गॉगल लावून होते. काही पत्रकारांपुढे त्यांनी गॉगल काढला. त्यांचा एक डोळा अर्धा बंद अवस्थेत होता.
अध्यक्षांच्या दालनात बंद दाराआड चर्चा
धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अध्यक्षांच्या दालनात बंद दाराआड चर्चा झाली.
कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय ‘क्लोज फॉर ऑर्डर’नंतरच
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी सदस्यांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना, ‘कोर्टाने सुनावणी पूर्ण करून त्याची ‘क्लोज फॉर ऑर्डर’ ठेवली आहे. ती ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील’, असे स्पष्ट केले.
शोक प्रस्तावाआधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोकाटे सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांचा विषय घेता येणार नसल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र, विरोधकांनी मंत्री दोन्ही सभागृहांचे असतात. त्यामुळे सभागृह नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली. गोंधळ पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावादिवशी गोंधळ होईल असे वाटले नव्हते, असा टोला लगावला.
काय घडले सभागृहांत अन् सभागृहांबाहेर?
औरंगजेब महान राजा होता, आझमींचे वादग्रस्त विधान औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबाच्या काळात भारत सधन होता, असे वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला.
शक्तिपीठ महामार्ग करणार : राज्यपाल राधाकृष्णन
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंदाजित किंमत ८६,३०० कोटी असून हा मार्ग सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येईल, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या.