Join us

मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक अखेर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:50 AM

आचारसंहितेचा फटका मुंबई विद्यापीठाला बसला आहे. सोमवार, २५ मार्च रोजी होऊ घातलेली मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक रद्द करण्यात आली आहे.

मुंबई : आचारसंहितेचा फटका मुंबई विद्यापीठाला बसला आहे. सोमवार, २५ मार्च रोजी होऊ घातलेली मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक रद्द करण्यात आली आहे. यामुळे निवडणूक संपेपर्यंत विद्यापीठाला बैठक करता येणार नसल्याचे कळते. आचारसंहितेच्या काळात अधिसभा घेण्यात येऊ नये असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून शुक्रवारी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले.मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक रद्द होण्याला मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया सिनेट सदस्यांकडून व्यक्त होत आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी सरकारने सिनेट सदस्यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यास मंजुरी दिली होती. या वेळीही योग्य मुदतीत प्रशासनाने बैठकीचे महत्त्व लक्षात घेता निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला तर बैठक घेता आली असल्याचे मत सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी व्यक्त केले.यासाठी आत्तापर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडूनही प्रश्न मागविणे, महाविद्यालयांची संपूर्ण माहिती गोळा करणे, माहिती पुस्तिका छापणे अशी तयारी करण्यात आली होती. मात्र आता जूनमध्ये बैठक झालीच तर ही तयारी पुन्हा करावी लागणार आहे. आचारसंहितेचा काळ आणि निवडणूक संपेपर्यंत कुलगुरूंना देण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्णय होतील त्यामुळे ते कधी कधी विद्यार्थी आणि सिनेटच्या मतांशिवाय होण्याची शक्यता असल्याने सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.वास्तविक, मुंबई विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. सर्वसामान्य जनतेला आमिष देण्याचे कोणतेही निर्णय यामध्ये होत नाहीत. विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या मांडण्याचे विद्यार्थी प्रतिनिधींचे हक्काचे सभागृह आहे. त्यामुळे या व्यासपीठाला मुकावे लागणार असून याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.- प्रदीप सावंत,सिनेट व अधिसभा सदस्य

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई