लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देणरा अर्थसंकल्प आमच्या सरकारने दिला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देताना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असला तरी महाराष्ट्र कधीच थांबला नाही आणि थांबणारही नाही. कोरोनाचे संकट कमी झाले की, राज्य पुन्हा पूर्ण सामर्थ्यानिशी भरारी घेईल.
आरोग्यसेवा, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, प्रत्येक जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड पश्चात समुपदेशन केंद्रे अशा अनेक निर्णयांद्वारे आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न अर्थसंकल्पातून झालेले दिसतात. बळिराजासाठी ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज वेळेत फेडले तर शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची योजना महत्त्वाची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मजबूत करणारी योजना, विकेल ते पिकेल योजनेतून शेतमालाला हमखास भाव, शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा संकल्प, महिलांच्या नावे घर खरेदीवर १ टक्का मुद्रांक शुल्क सवलत हे लोकाभिमुख निर्णय आहेत.
आदरातिथ्य व्यवसायास उद्योगाचा दर्जा, कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हेन, बीच शॅक्स, लोणार सरोवराचा विकास, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे संवर्धन यामुळे पर्यटक वाढतील.
मुंबई, नागपूर, पुणे मेट्रो प्रकल्प, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. मुंबई विकासाच्या अनेक प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.