मुंबई : मराठी नववर्षाच्या स्वागताकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही गिरगाव सज्ज झाले असून, शोभायात्रांची जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी २८ मार्च रोजी गिरगावातील फडके गणेश मंदिरापासून निघणारी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात निघणार आहे. यंदाची स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रा शौर्यगाथेवर आधारित असून, यात्रेची संकल्पना ‘परंपरा ही शौर्याची, ऐक्याची, नवतेजाची’ अशी आहे. यंदा मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी साकारलेल्या २० फूट उंच बाजी प्रभू देशपांडे यांच्या कागदी शिल्पाच्या हातात यात्रेची मुख्य गुढी हे उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.यात्रेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील भारतातील शौर्य परंपरेचे दर्शन घडविण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. या वर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे १५वे वर्ष आहे. यात्रेचा प्रारंभ सकाळी ८.३० वाजता फडके गणेश मंदिरापासून गुढीपूजनाने होईल. मूर्तिकार प्रदीप मादुस्कर यांनी साकारलेली गणेशाची मूर्ती यात्रेच्या अग्रस्थानी असेल. गिरगावातील महिला व युवती या गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे पठण करणार आहेत. २६ जानेवारी रोजी राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा राज्य शासनाचा लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्ररथ यात्रेचे खास आकर्षण ठरणार आहे. याशिवाय, प्रसिद्ध कलादिग्दर्शक तुषार कोळी कडेपठारचा राजा श्रीक्षेत्र जेजुरीचा देखावा घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशातील दुचाकीस्वार, महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, नयनरम्य संस्कारभारती रांगोळ्या आणि रंगशारदातर्फे रांगोळ्यांच्या पायघड्या असणार आहेत. लावणी, भारूड, गोंधळ, वासुदेव, नंदीबैल, कडकलक्ष्मी इत्यादी लोककलेच्या समृद्ध परंपरेचे सादरीकरणही यात्रेत करण्यात येईल. यात कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथकही सहभागी होणार आहे. (प्रतिनिधी)
बाजी प्रभू देशपांडे यांच्या हाती नववर्षाची गुढी
By admin | Published: March 23, 2017 1:50 AM