मुंबई - मुंबईत येत्या 1 एप्रिलपासून म्हशीच्या दूध दरात वाढ होणार आहे. ही वाढ सुट्या दूधावर करण्यात आली आहे. दूधाच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई मिल्क असोसिएशनने घेतला आहे.
मुंबई-ठाणे परिसरातील दूध दरात येत्या गुरुवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. होलसेल दरात 64 रुपये प्रतिलीटर असणाऱ्या दूधासाठी ग्राहकांना 66 रुपये मोजावे लागणार आहेत. तर किरकोळ दूधाचे दर 70 रुपये ते 75 रुपये पोहचणार आहेत.
वाढत्या महागाईमुळे चारा, मजूर, वाहतूक खर्च वाढल्यामुळे मुंबई मिल्क असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत दूध दरवाढ करण्यात आल्याची माहिती मुंबई मिल्क असोसिएशनचे अध्यक्ष वलीभाई पीरजी यांनी दिली. सुट्या दूधावर ही दरवाढ असल्याने सध्या तरी वाढीव दराचा अमूल, गोकुळ, गोवर्धन यासारख्या कंपनींच्या पाकिटबंद दूधावर याचा परिणाम होणार नाही.