'सोयीसाठी पर्यायी मार्ग बांधा, पण पर्यावरणाची हानी नको'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:22 AM2020-08-13T01:22:59+5:302020-08-13T01:23:04+5:30
पर्यावरणवाद्यांची मागणी; पश्चिम द्रुुतगती मार्गाचा विकास
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात दाखल होण्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्ग असतानाच आता या मार्गासाठी आणखी एक पर्यायी मार्ग प्रस्तावित असून, बोरीवलीपासून दहिसरपर्यंतच्या या मार्गादरम्यान या कामात मोठ्या प्रमाणावर तिवरांचे जंगल तोडले जाणार आहे. परिणामी याबाबत पर्यावरणवाद्यांकडून आवाज उठविला जात असून, आमचा रस्त्यास विरोध नाही तर तिवरांची कत्तल होत आहे; यास विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुुतगती मार्गालगत दहिसर पश्चिमेला तिवरांचे जंगल आहे. तेथे बोरीवली-दहिसर एक्सर येथे पश्चिम द्रुुतगती मार्गाला पर्यायी मार्ग प्रस्तावित आहे. येथून हा मार्ग जात आहे. या जागेचा विचार करता येथे हा मार्ग बांधला तर तिवरांच्या जंगलाची मोठी हानी होईल. पर्यावरणाची हानी होत असेल तर हा विकास कोणासाठी आहे, असा प्रश्न आहे. या कामात किमान अर्धा रस्ता तिवरांना हानिकारक असेल. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता बांधावा. मात्र पर्यावरणाची हानी करू नये, असे आमचे म्हणणे आहे.
मुंबईत पूर्वीपासून अनेक प्रकल्पांदरम्यान पर्यावरणाची हानी झाली आहे. परिणामी मुंबईमधील पर्यावरण नष्ट होत आहे. विकास कोणाला नको. विकास सर्वांना हवा आहे. मात्र विकास करताना स्थानिकांना, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे म्हणणे पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार मांडले जाते. परंतु सूचना आणि हरकती मागविण्यापलीकडे काहीच केले जात नाही, अशी टीका पर्यावरणवाद्यांकडून केली जाते आहे.
दरम्यान, सागरी रस्ता असो, सीलिंक असो वा यासारखे प्रकल्प असो. असे प्रकल्प उभारल्याने मुंबईकरांचा वेळ वाचेल. वाहतूक सुरळीत होईल, असे अनेक दावे सरकारकडून केले जातात. मात्र प्रत्यक्षात या काळात पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागते, असे पर्यावरणवाद्यांनी सांगितले.
असा आहे प्रस्तावित पर्यायी मार्ग
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा मार्ग प्रस्तावित आहे.
मुंबई, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार अशी जोडणी असेल.
बोरीवली-दहिसर येथील एक्सर गावालगतहून हा रस्ता जातो आहे.